घनकचरा व्यवस्थापनासाठी आता दशवार्षिक आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:10 AM2021-08-28T04:10:37+5:302021-08-28T04:10:37+5:30
मुंबई : मुंबईतील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन मुंबईकरिता विकास ...
मुंबई : मुंबईतील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन मुंबईकरिता विकास आराखड्याच्या धर्तीवर मनपा मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाचा दशवार्षिक आराखडा तयार करणार आहे.
मुंबईतील कचऱ्याची समस्या नियोजनाच्या अभावामुळे दिवसेंदिवस बिकट होत आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून ओला, सुका व घातक कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आले. मात्र हा कचरा वेगवेगळा उचलण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली नाही. कचऱ्यापासून वीज निर्मिती, मिथेन गॅस असे प्रकल्प राबवण्याचा निर्णय झाला, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. तसेच मोठ्या गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुलांकडून त्यांच्याच आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या उपक्रमाला खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील कचरा समस्या अधिक उग्र स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक सचिन पडवळ कचऱ्याची विल्हेवाट नियोजनबद्ध करून आणि घनकचरा शून्यावर आणण्यासाठी प्रभावी योजनांचा समावेश असलेले दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईच्या विकास आराखड्याच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा दशवार्षिक आराखडा तयार करावा, अशी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली होती. त्यानुसार स्थापत्य समिती शहर यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा दशवार्षिक आराखडा तयार करण्यासाठी मनपाने सल्लागार नेमला आहे, अशी माहिती पडवळ यांनी दिली.