मुंबई : इच्छुकांच्या याद्या मोठ्या असल्याने अनेक प्रभागांमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. यापैकी काही उघड बंड करून पक्षाबाहेर पडले तर काही धुसफूस करीत पक्षातच राहिले. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने माघार घेणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या मनात मात्र राग खदखदत आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या छुप्या कारवायांनी अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ आणले आहेत. प्रचाराला दांडी, प्रतिस्पर्धी पक्षाच्या सभांना जाणे अशा पद्धतीने उमेदवाराला पाडण्याचे सर्वच प्रयत्न नाराजांकडून सुरू आहेत. यामुळे उमेदवारांचे टेन्शन मात्र वाढले आहे.२२७ प्रभागांसाठी २२७५ उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या वेळी सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने आतापर्यंत मित्रपक्षासाठी सोडण्यात आलेल्या प्रभागांमध्येही सर्वच पक्षांचे उमेदवार आहेत. या उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोर लावला होता. काही ठिकाणी प्रभागातून कोणाला उमेदवारी द्यावी, अशी शिफारस पत्रेही स्थानिक नेते, शाखांकडून गेली होती. परंतु अनेक ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून मर्जीतल्या उमेदवाराला तिकीट मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात नाराजीचे स्फोट काही प्रभागांमध्ये झाले. सायन कोळीवाड्यात शिवसेना उमेदवाराला विरोध झाला होता. चारकोपमध्येही असाच विरोध शिवसेनेची डोकेदुखी ठरला. चारकोपमधील उपविभागप्रमुखाने तर भाजपात प्रवेश करून राग व्यक्त केला. पक्षश्रेष्ठींनी आवाहन केल्यानंतर हे बंड थंडावले. काही प्रभागांमध्ये ही नाराजी प्रचारफेऱ्यांमधून व्यक्त झाली. उमेदवाराच्या सभा, प्रचाराला न जाणे यांसह अनेक छुप्या कारवायांनी उमेदवारांना सध्या चांगलीच धडकी भरलेली आहे. (प्रतिनिधी)
आता छुप्या कारवायांचे टेन्शन
By admin | Published: February 20, 2017 7:01 AM