मुंबई-
राज्याच्या राजकारणात शिवसेना आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरी गेली. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. शिवसेना भवनात बैठका घेऊ लागले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरून बंडखोरांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. बंडखोरांवर घणाघाती टीका करत आहेत. आतापर्यंतच्या सर्व घडामोडींवर आता स्वत: उद्धव ठाकरे आपली रोखठोक भूमिका मांडणार आहेत. शिवसेना खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या 'जोरदार' मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत.
मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि पक्षात फूट पडली यात नेमकं काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं टिझरमध्ये दिसून येत आहे. यात अखेरीस उद्धव ठाकरे यांनी "आता पुन्हा एकदा सामान्यांना सामान्यातून असामान्य लोक घडविण्याची वेळ आली आहे", असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता शुन्यातून सुरुवात करण्याची आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याची तयारी सुरू केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.
बंडखोरांवर जोरदार टीकामुलाखतीत उद्धव ठाकरे शिंदे गटातील आमदारांवर बरसताना दिसत आहेत. "निवडणुकीला सामोरं जा. तुम्ही पाप केलं तर तुम्ही नाहीतर आम्ही पाप केलं असेल तर आम्हाला जनता घरी बसवेल. तुमच्यात कर्तृत्व नाहीय. तुमच्यात हिंमत नाहीय आणि तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात", असं उद्धव ठाकरे बंडखोरांवर टीका करताना म्हणाले. "माझ्याकडून कुणी माईक नाही खेचला?", असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली आहे.
कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का पुसू शकणार नाहीआज जी शिवसेनेत फूट दिसत आहे. अशाप्रकारची फूट याआधी राणे, भुजबळांनाही पाडता आली नव्हती असं संजय राऊत यांनी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला. "कितीही फूट पाडलीत. तरी तुमच्या कपाळावरती विश्वासघाताचा शिक्का मारला गेलाय तो कधीच पुसता येणार नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले.