...आता सेंट्रल अलार्म वाजणार, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 06:28 AM2024-08-21T06:28:11+5:302024-08-21T06:28:50+5:30
गेल्या आठ दिवसांपासून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनावर सोमवारी पालिका प्रशासनाने मुख्य कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
मुंबई : निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आता रुग्णालयात सेंट्रल अलार्मची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच निवासी डॉक्टरांसाठी नवा हेल्पलाइन नंबरसुद्धा देण्यात येणार आहे. यासह इतर काही नवीन उपयोजना पालिकेतर्फे रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने डॉक्टरांना सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनावर सोमवारी पालिका प्रशासनाने मुख्य कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये निवासी डॉक्टर संघटेनच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालयांच्या संचालिका, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त आणि निवासी डॉक्टर संघटनेचे विविध वैद्यकीय महाविद्यालयातील १५ ते २० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी ११ मागण्यांचे निवेदन प्रशासनासमोर ठेवले आहेत.
डॉक्टरांना रुग्णालय परिसरात अॅम्ब्युलन्स देणार
महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी रुग्णालयांत सेंट्रल अलार्मची व्यवस्था करू, निवासी डॉक्टरांसाठी नवा हेल्पलाइन नंबर, नवीन स्मार्ट आयडी कार्ड, वॉर्डमधील रुग्णांना काही चाचण्या करण्यासाठी बाहेर पाठविले तर आया किंवा वॉर्डबॉय सोबतीला असतील, याची व्यवस्था करण्याच्या सूचना अधिष्ठातांना दिल्या आहेत.
जेथे रुग्णालय परिसर मोठा आहे तेथे निवासी डॉक्टरला रुग्णाला तपासणीसाठी एका ठिकाणाहून काही अंतरावर जायचे असल्यास अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक रुग्णलयात ऑन कॉल महिला आणि पुरुष डॉक्टरांसाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. शारीरिकदृष्ट्या 'फिट' सुरक्षा रक्षक असतील. या उपाययोजना करण्यात येणार आहे.
- पालिका प्रशासनाबरोबर बैठक झाली. त्यावर आमच्या चार रुग्णालयांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बसून निर्णय घेऊ. काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. - डॉ. अक्षय डोंगरदिवे, बीएमसी, मार्ड महासचिव