बालगृहातील मुलींच्या संरक्षणासाठी आता शासकीय सुरक्षा देणार; सरकारचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 05:21 PM2022-09-14T17:21:18+5:302022-09-14T17:21:46+5:30

गोवंडी मुली गायब होण्याच्या घटनेबाबत वरिष्ठ अधिकारी विमला अय्यंगार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली

Now the government will provide security for the protection of girls in children's homes; Government decision | बालगृहातील मुलींच्या संरक्षणासाठी आता शासकीय सुरक्षा देणार; सरकारचा निर्णय 

बालगृहातील मुलींच्या संरक्षणासाठी आता शासकीय सुरक्षा देणार; सरकारचा निर्णय 

googlenewsNext

मुंबई - गोवंडी येथील बालगृहातून ६ मुली गायब होणं अतिशय दुर्देवी घटना आहे. या घटनेबाबत महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात याठिकाणचे खासगी सुरक्षा रक्षक कंपनीकडून काम काढून त्याऐवजी सरकारी सुरक्षा संस्थांना हे काम देण्यात येईल. या घटनेबाबत वरिष्ठ अधिकारी विमला अय्यंगार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली असून ती ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. 

याबाबत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, सुरक्षेच्या दृष्टीने बालसुधार गृहात आणखी काय उपाययोजना करता येतील का यावर चर्चा सुरू आहे. मुला-मुलींच्या मनात पुढे काय हा प्रश्न असतो. त्यासाठी आरोग्य सेवा, समुपदेशन केंद्र, मार्गदर्शन करून त्यांच्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येईल. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या सुरक्षा कंपनीवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं. 

काय आहे प्रकरण?
गोवंडीच्या विशेष बालगृहातून ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. वसतिगृहाची सिमेंटची खिडकी दगडाने फोडून, खिडकीचे लोखंडी ग्रील काढून व त्या खिडकीचे बाहेरील बाजूस असणारे लोखंडी ग्रील वाकवून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा संशय होता. त्यानुसार, गोवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. यामध्ये १७ वर्षाच्या तीन, १५ वर्षाच्या दोन आणि १६ वर्षाच्या एका मुलीचा समावेश आहे. गोवंडीतील सायन-ट्रॉम्बे रोडवर अल्पवयीन मुलींसाठी शासकीय मुलींचे विशेष पुनर्वसन केंद्र (विशेष बालगृह) आहे. न्यायालयाच्या आदेशाने या मुलींना येथे काळजी व संरक्षण देण्यासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.

रविवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान या वसतिगृहाची सिमेंटची खिडकी दगडाने फोडून आणि त्या खिडकीचे लोखंडी ग्रील काढण्यात आले. तसेच, त्या खिडकीच्या बाहेरील बाजूला असणारे लोखंडी ग्रील हे वाकवून मुलींना येथून गायब झाल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्राच्या निशिगंधा विठोबा भवाळ (३१) यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवत गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेतील ४ मुलींचा शोध लागला असून इतर दोघींचा शोध सुरू आहे. 
 

Web Title: Now the government will provide security for the protection of girls in children's homes; Government decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.