Join us

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 9:44 PM

वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.

मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले, ठाकरेंची सुरक्षा करण्यास शिवसैनिक सक्षम आहेत असं विधान खासदार विनायक राऊतांनी केले होते. ठाकरेंची सुरक्षा कमी केली यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु या प्रकारावर आता गृह विभागाने खुलासा केला आहे. 

गृहविभागाने म्हटलं की, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे. सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.

विनायक राऊतांनी साधला होता निशाणाअख्ख्या जगातील दहशतवादी आहेत त्यांच्या हिटलिस्टवर मातोश्री आहे. वर्षानुवर्षे मातोश्रीला सुरक्षा होती, वेळोवेळी ती वाढवण्यात आली होती. परंतु राज्यात गद्दारांचे सरकार आल्यानंतर आजपासून मातोश्रीचे मुख्य प्रवेशद्वार ते आतपर्यंत खूप मोठ्या संख्येने कपात केली आहे. द्वेष आणि घाणेरड्या राजकारणामुळे ही सुरक्षा कमी करण्यात आली. दुसरीकडे ठाण्यात नगरसेवक, त्यांच्या पत्नीला, पीएलाही सुरक्षा देण्यात आली आहे. गद्दारांना सुरक्षा दिली जाते पण मातोश्रीची सुरक्षा कपात केली जाते हा निदंनीय प्रकार आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेगृह मंत्रालयपोलिस