Join us

आता रुग्णालयेच सांगणार... अवयदान करा! जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 12:48 PM

राज्यातील अवयवदानाचा टक्का वाढविण्यासाठी हातभार लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील अवयवदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने अवयदान जनजागृती अभियान हा उप्रक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली. राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, मुंबईत जे.जे. रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी अवयवदानासंदर्भातील शपथ घेतली. मेंदुमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती तफावत दूर करण्यासाठी मेंदुमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.

अवयदानाची आकडेवारी कमी असल्याने आजही मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत. कोरोना काळात या मोहिमेला मोठ्या प्रमाणात खीळ बसली होती. मुंबईसह राज्यातील विविध भागांतील रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण झाल्यानंतर रुग्ण सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगत आहेत. सध्या भारतात सुमारे ५७० अवयव प्रत्यारोपण केंद्रे असून,  जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत. दुसरे म्हणजे यातील बहुसंख्य केंद्रे ही खासगी रुग्णालयात आहेत. जिथे उपचारांचा खर्च सर्वांना परवडणारा नाही. या पार्श्वभूमीवर अवयव जनजागृती अभियान प्रभाविपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

४९ हजार नागरिकांनी घेतली शपथ

राज्यातील ११ कोटी २३ लाख लोकसंख्येतून केवळ ४९ हजार नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली आहे. याबाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे, तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी केवळ ७२ केंद्रे, यकृत प्रत्यारोपणासाठी ३६ केंद्रे आणि हृदय प्रत्यारोपणासाठी ९ केंद्रे असून, इतर प्रत्यारोपणासाठी फारच कमी केंद्रे आहेत.

वर्षभर राबविणार उपक्रम

रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, अवयदान जनजागृतीसाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या डॉक्टर व मेडिकल सोशल वर्कर यांना पुढील आठवड्यात सन्मानित केले जाईल.

टॅग्स :अवयव दानहॉस्पिटलडॉक्टर