आता खड्डे दिसणार नाहीत! दिवसा पाहणी, रात्री बुजविणार; खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:21 PM2023-08-01T14:21:03+5:302023-08-01T14:21:55+5:30
विशेष पथकांकडून युद्धपातळीवर करण्यात येणाऱ्या या कामात प्रत्येक विभागीय स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजविण्यासाठी या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम पाहणार आहेत.
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पालिका प्रशासन टीकेचे धनी होत असल्यामुळे आता खड्ड्यांसाठी पालिकेकडून विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाने पाहणी केल्यानंतर रात्री खड्डे बुजविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विशेष पथकांकडून युद्धपातळीवर करण्यात येणाऱ्या या कामात प्रत्येक विभागीय स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजविण्यासाठी या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम पाहणार आहेत. दिवसा खड्ड्यांची पाहणी करून रात्रीच्या वेळेत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यासाठी मास्टिक रॅपिड हार्डनिंग काँक्रीट पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
दरम्यान, खड्डे बुजविताना रस्त्याची रुंदी किती आहे, कोणाच्या हद्दीतील किंवा कोणाच्या मालकीचा रस्ता आहे, या गोष्टी मागे ठेवून खड्डे बुजविण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या. सोमवारी अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी तातडीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खड्ड्यांसंबंधी सूचना केल्या. प्रत्येक विभागातील रस्ते अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे आपापल्या कामाचा अहवाल सादर करतील. मात्र, त्यांच्यासोबत इतर सर्व पथके पावसाळ्याच्या काळात प्रत्यक्ष ऑन फिल्ड कार्यरत राहतील, याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
खड्डे भरण्यासाठी सध्या कोल्डमिक्स, मास्टिक एजन्सी आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रीट अशा तीन पद्धतीमधून काम सुरू आहे.
- विभागनिहाय खड्डे बुजविण्यासाठी उपलब्ध निधी २ कोटी
- प्रतिबंधात्मक उपयासाठी १.५० कोटी
- खड्डे बुजविण्यासाठी ५० लाख
- मुंबई पालिकेने १ ते २४ जुलैदरम्यान बुजविले खड्डे - ६ हजार ४५
खड्ड्यांची तक्रार इथे करा
- ऑनलाइन पोर्टल / ॲप : MyBMCpotholefixit ॲप
- आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक : १९१६
२४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र (CFC) व लेखी तक्रारी देणे.
- टोल फ्री दूरध्वनी क्रमांक : १८००२२१२९३
- ट्विटर : @mybmcroads
- बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक : ९१-८९९९-२२-८९९९
...तर कंत्राटदारांना दुप्पट दंड
प्रकल्प रस्त्यांबाबतीत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर दुप्पट दंड आकारणी आणि कठोर कार्यवाही करावी, अशा सूचना बैठकीत दिल्या. खड्डे बुजविण्याच्या कामांचा खर्च संबंधित यंत्रणांकडून घेण्यासाठी नंतर परतावा शुल्क वसुली सादर करता येतील. त्यामुळे सध्या खड्डे बुजविण्याला प्राधान्य द्यावे, असे वेलारासू यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.