आता तुमची कटकट मिटली; लाईट बिलाच्या पेमेंटची वेळ कमी होणार
By सचिन लुंगसे | Published: September 1, 2022 07:36 PM2022-09-01T19:36:34+5:302022-09-01T19:37:53+5:30
सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे. पुढील वर्षभरात ८० टक्के पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट होऊ शकते.
सचिन लुंगसे
मुंबई : कुलाबा आगारात बेस्ट उपक्रमाचे प्रशासक तथा महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते वीज देयकाचे प्रदान सुलभतेने होण्यासाठी डायनॅमिक क्यू आर कोड चा लोकार्पण सोहळा पार पडला. चंद्र यांनी सांगितले की, आजच्या डायनॅमिक क्यूआर कोड लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मी टीजेएसबी बँकेच्या टीमचे स्वागत करतो. यासाठी बेस्ट उपक्रमाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घेतला. त्याचबरोबर टीजेएसबीने कमीत कमी वेळेत क्यू आर कोड ची व्यवस्था करून दिली. बेस्टचे साडे दहा लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहक असून त्यांना चांगली सेवा देण्याकरता बेस्ट वेळोवेळी प्रयत्न करत आहे. बिल पेमेंटचा वेळ कमी करण्याच्या कामी क्यूआर कोडचा निश्चित उपयोग होऊ शकतो. बिल काउंटरवर क्यू आर कोड इन्स्टॉल करून वीज ग्राहकांना देयकाचे प्रदान करता येऊ शकते.
सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे. पुढील वर्षभरात ८० टक्के पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट होऊ शकते. उपक्रमातर्फे स्मार्ट मीटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकूणच विद्युत पुरवठा प्रणाली मध्ये सुधारणा करण्यासाठी ३५०० कोटीचा प्रकल्प बेस्ट उपक्रमाने तयार केला आहे. येणाऱ्या कालावधीत वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा उपक्रमाचा प्रयत्न राहणार आहे. वीज ग्राहकांना सर्वोत्तम अशी सुरक्षित व संरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न उपक्रमाद्वारे कायम करत आहोत. टीजेएसबीच्या मुख्य महाव्यवस्थापक सुब्बलक्ष्मी म्हणाल्या की, सदर क्यू आर कोड डिजिटल सहीमुळे अत्यंत सुरक्षित आहे आणि अशी सेवा देणारी बेस्ट ही एकमेव संस्था आहे. टीजेएसबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील साठे म्हणाले की, बेस्ट उपक्रमाच्या सोबत अशा प्रकारच्या डिजिटल सेवा उपलब्ध करण्यात टीजेएसबी नेहमी तत्पर आहे.