आता आरेच्या अंतर्गत रस्त्यांचे रुपडे पालटणार! देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अखेर महापालिकेकडे!
By मनोहर कुंभेजकर | Published: June 9, 2023 05:22 PM2023-06-09T17:22:41+5:302023-06-09T17:23:05+5:30
आरे दुग्ध वसाहतीतील सुमारे ४५ किमी लांबीचे अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
मुंबई :आरेतील अंतर्गत रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे देण्याबाबतचे परिपत्रक कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे उप सचिव नि. भा. मराळे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ६ जून २०२३ रोजी महापालिका आयुक्त यांच्या नावे काढले आहे. आरे दुग्ध वसाहतीतील सुमारे ४५ किमी लांबीचे अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
आरेतील उखडलेल्या रस्त्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ही स्थानिकांनी दाखल केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने आरेतील अंतर्गत रस्ते मुंबई महानगरपालिकेकडे देखभाल व दुरूस्तीसाठी देण्याचे नमूद केले. आरे प्रशासनाकडे पुरेसा निधी नसल्याने अंतर्गत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम रखडले होते.मात्र सदर निर्णयामुळे परिणामी भविष्यात आरेतील अंतर्गत रस्ते सुस्थिततीत मिळणार असल्याने आरेतील रहिवाशी सुखावले आहेत.
आरेच्या विविध पाड्यांमध्ये जाणारे सुमारे ४५ कि. मी. रस्ते आहेत. या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. त्यामुळे येथील रस्त्यांमुळे रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आमदार वायकर यांनी आरेतील अंतर्गत ४५ कि. मी चे रस्ते चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी त्यांनी विधानसभेत लक्षवेधी, तारांकीत प्रश्न, अर्धातास चर्चा आधी आयुधांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री, पशु व दुग्ध व्यवसाय मंत्री, आरेचे आयुक्त, दशु व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार तसेच बैठक घेऊन वरील प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला होता.
आरेमध्ये पडणार्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच पावसाचे पाणी वाहुन नेण्यासाठी गटाराची व्यवस्था नसल्याने आरेतील डांबराचे रस्ते बनविण्यासाठी लाखो रुपये खर्च करुनही पावसात रस्ते सुंपर्ण पणे उखडले जात होते. त्यामुळे आरेचा मुख्य रस्ता दिनकर देसाई मार्ग हा मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी त्यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार दिनकर देसाई मार्ग मनपाकडे हस्तांतरीत करण्यात आला असून हा रस्ता मनपाच्या माध्यमातून सिमेंट काॅक्रीटचा करण्यात येत आहे. यासाठी सुमारे ४७ कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे.
आरेचे अंतर्गत ४५ कि. मी चे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १७८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तसेच डांबराचा रस्ता तयार करायचा असेल ७८ कोटींचा प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यापैकी डांबराचा रस्ता बनविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावातील पहिल्या टप्प्यात ४८ कोटी रुपये देण्याची तयार राज्य शासनाने दर्शवली होती. मात्र गेल्या ६ महिन्यांपासून याची फाईल वित्त विभागाकडे मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहे अशी माहिती वायकर यांनी लोकमतला दिली.