विशेष मुलाखत:
राज चिंचणकर
१ सप्टेंबरपासून नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू केली जातील, असे आश्वासन ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या कलावंतांच्या मंचाला मिळाले होते. मात्र तसे काही घडले नाही. नाट्यगृहे व चित्रपटगृहे अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर, या आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते व ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्याशी साधलेला संवाद...
अद्याप नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत; त्याबद्दल काय सांगता येईल?
१ सप्टेंबरपासून नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करायला हरकत नाही आणि त्याचा आम्ही आढावा घेऊ, असे शासनाकडून आम्हाला आश्वासन मिळाले होते. त्यामुळे आम्हाला वाटले होते की नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू होतील; परंतु तसे चिन्ह दिसत नसल्याने, आशादायक चित्र डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही नटराजाची पूजा करून महाआरती केली. पण अजून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचलेला नाही, असे वाटते.
यापुढे कोणते पाऊल उचलणार आहात?
आता अजून काही दिवस थांबून वाट बघू. कारण या काळात छोट्या कलाकारांची खूपच वाताहात झाली आहे. आम्ही आशा करत होतो की बागा, चौपाट्या सुरू झाल्या आहेत, तर नाट्यगृहे व चित्रपटगृहेही सुरू होतील. सांस्कृतिक मंत्री तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी किमान मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी अपेक्षा होती. अशी परवानगी मिळाली असती, तरी महाराष्ट्रातील छोट्या छोट्या गावांत कार्यक्रम सुरू करता आले असते. आता गणेशोत्सव येत आहे; तर त्यात गण, गवळण, तमाशा, भारूड, भजन, दशावतार सादर करता आले असते. झाडीपट्टी रंगभूमीवरही नाटके चालू झाली असती. पण परवानगी नसल्याने फार विदारक असे चित्र आहे. नजीकच्या काळात हे सर्व सुरू झाले नाही, तर आम्हा सर्व कलाकारांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करावेच लागेल.
नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू न होण्यामागे नक्की अडचण काय आहे?
नाट्यगृहे व चित्रपटगृहे लवकर सुरू व्हावीत म्हणूनच आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ‘तिसरी लाट’ या संभाव्य प्रकाराने जर का नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू झाली नाहीत; तर समस्या अधिकच वाढणार आहेत. आरोग्यमंत्री म्हणाले आहेत की, तिसरी लाट आलीच, तर सध्या सुरू केलेली हॉटेल्स, व्यायामशाळा, चौपाट्या वगैरे बंद करू. ठीक आहे मग. सध्या आमची नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करा आणि तिसरी लाट आली तर बंद करा. पण आधी सुरू तर करा. टास्क फोर्ससमोर आम्हाला बसवा आणि आम्हाला आमची बाजू मांडू द्या. कोरोना आणि तिसरी लाट हे केवळ आम्हा कलावंतांनाच सांगितले जात आहे. बाकी सर्रास सर्व सुरू आहे. सर्व वाहतूक सुरू आहे, रस्त्यावर अमाप गर्दी आहे, बाजार ओसंडून वाहात आहेत. मग फक्त कलावंतांच्या बाबतीतच असे का?
तुमच्या आंदोलनाला आघाडीच्या कलावंतांकडून पाठिंबा मिळत आहे का?
आमचे आंदोलन हे केवळ नाटक व चित्रपट कलावंतांसाठी नाहीय. जे जे रंगकर्मी आहेत; म्हणजे पोतराज, डोंबारी, भारूड, कीर्तन, वाद्यवृंद अशा विविध क्षेत्रात जे लोक कला सादर करतात यांच्यापासून नाटक, चित्रपट क्षेत्रातील कलावंतांसाठी हे सर्व आम्ही करत आहोत. हे आंदोलन आपल्याच बांधवांसाठी करतोय, हे सर्वच क्षेत्रातील छोट्या-मोठ्या कलाकारांनी समजून घ्यायला हवे. माझा कुणावर आरोप नाही; पण आपण सर्वांनी एकत्र येऊन आपली एकजूट शासनाला दाखवून देऊया.
(सोबत : विजय पाटकर यांचा फोटो).