आता शिर्डी विमानतळावरूनही होणार मालवाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:06 AM2021-03-23T04:06:40+5:302021-03-23T04:06:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिर्डी विमानतळावरून प्रवासी सेवेसह कार्गो वाहतूक करण्याची परवानगी नागरी उड्डाण सुरक्षा विभागाने (बीसीएएस) दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिर्डी विमानतळावरून प्रवासी सेवेसह कार्गो वाहतूक करण्याची परवानगी नागरी उड्डाण सुरक्षा विभागाने (बीसीएएस) दिली आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यस्थेला चालना मिळणार असल्याचे महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले.
मुंबई, पुणे आणि नागपूर पाठोपाठ शिर्डी हे राज्यातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडून या विमानतळाची उभारणी करण्यात आली असून, सध्या आंतरराष्ट्रीय धर्तीवर सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. येथून माल वाहतुकीस परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू होता. ‘बीसीएएस’ने मान्यता दिल्याने त्यास यश आले आहे’, असे कपूर यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
..................
शिर्डी विमानतळावरून देशांतर्गत मालवाहतूक करण्यास परवानगी मिळाली आहे. लवकरच मर्यादित मालवाहतूक सेवा शिर्डी विमानतळ सुरू करण्यात येईल. त्यासाठी काही आवश्यक उपकरणे बसविण्यात येत असून, काम प्रगतीपथावर आहे.
- दीपक शास्त्री, विमानतळ संचालक, शिर्डी विमानतळ
...........................
नाईट लॅण्डींगसाठी परवानगीची प्रतीक्षा
शिर्डी विमानतळाचे नाईट लॅण्डींगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सुविधेला मंजुरी मिळावी यासाठी नागरी उड्डाण संचालनालयाला (डीजीसीए) पत्र पाठविण्यात आले आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळावर विमानांची वर्दळ वाढेल, अशी माहिती देण्यात आली.