मुंबई : घर खरेदीदारांचे हीत सुरक्षित राहावे व बँक खात्यांच्या वापरात समानता यावी यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) एकाच शेड्यूल बँकेत, एका प्रकल्पाचे संचलन खाते (कलेक्शन बँक अकाउंट), विभक्त खाते (सेप्रेट बँक अकाउंट) आणि व्यवहार खाते (ट्रान्झेक्शन अकाउंट), अशी तीन खाती ठेवण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे.
बिल्डरांचे नाव आणि प्रकल्पाचे नाव यांच्याच नावावर ही खाती काढायची असून, घर खरेदीदारांकडून घेतला जाणारा पैसा बिल्डरांना या खात्यातच जमा करावा लागणार आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होणार नाही, असा दावा ‘महारेरा’कडून करण्यात आला आहे.
बिल्डर ग्राहकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेतात. वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये त्यांचे पैसे जमा करत असतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. मात्र, या नवीन प्रस्तावात घर घेताना ग्राहकांकडून जमा होणारे, फक्त सरकारी कर, शुल्क वगळून, सर्व पैसे मग ते पार्किंगसाठी असोत किंवा सुविधांसाठी असोत ते एकाच खात्यात जमा करावे लागतील. याशिवाय या खात्याचा क्रमांक विक्री करारात नमूद करणे बंधनकारक आहे. घर खरेदीदारांकडून घेतला जाणारा पैसा फक्त या खात्यातच जमा करणे बंधनकारक राहील.
१५ एप्रिलपर्यंत हरकती पाठविण्याची मुभा -
प्रस्तावाचा सल्लामसलत पेपर ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. संबंधितांनी याबाबतच्या सूचना, हरकती, मते १५ एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आवाहन ‘महारेरा’ने केले आहे. प्रकल्प वास्तुशास्त्रज्ञ, प्रकल्प सनदी लेखापाल आणि प्रकल्प अभियंता यांच्या प्रमाणपत्राशिवाय बिल्डरला विभक्त खात्यातून पैसे मिळणार नाहीत. खात्यांवर कुठल्याही तिसऱ्या पक्षाचा हक्क राहणार नाही. कुठल्याही यंत्रणांकडून खात्यांवर टाच येणार नाही. याची काळजी घेण्याची जबाबदारी बँकेची असेल.
गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी त्या प्रकल्पात शिस्त महत्त्वाचा भाग आहे. आर्थिक व्यवहाराचे सूक्ष्म नियंत्रण करता यावे, यासाठी एकाच बँकेत संचलन, विभक्त आणि व्यवहार खाते प्रस्तावित केले आहे. घर खरेदीदारांकडून येणारा पैसा इतरत्र वापरला जाऊ नये, हा हेतू आहे. ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन अंतिम निर्णय घेतला जाईल - अजय मेहता,अध्यक्ष, महारेरा
बँकेने तपशील पडताळून घ्यावा -
१) बँकेने ही खाती उघडताना तपशील ‘महारेरा’च्या संकेतस्थळावरून पडताळून घ्यावा.
२) प्रकल्प पूर्ण होण्याच्या तारखेला खात्यातील सर्व व्यवहार थांबावेत.
३) ‘महारेरा’ने प्रकल्पाला मुदतवाढ दिल्याशिवाय त्या खात्याचा वापर करता येणार नाही.
४) बिल्डरला प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय बँक खाते बदलता येणार नाही.