आता रस्त्यावर नव्हे टेकडी, मोकळ्या मैदानात होणार वृक्षारोपण; महापौरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:09 PM2021-06-04T20:09:13+5:302021-06-04T20:09:59+5:30
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर यांनी भायखळा येथील महापौर निवासस्थानी शुक्रवारी वृक्षारोपण केले.
मुंबई - झाडे, पशुपक्षी ही नैसर्गिक साखळी आहे. ही साखळी टिकून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांचे रोपण होणे आवश्यक आहे. मात्र रस्त्याच्या पदपथाला झाडे न लावता मुंबईतील मोकळी मैदाने व टेकड्या याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर यांनी भायखळा येथील महापौर निवासस्थानी शुक्रवारी वृक्षारोपण केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे विविध प्रकारच्या जीवघेण्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही वातावरण निर्मिती करणे, वृक्षारोपण जतन व संवर्धनाचे काम पालिकेचे उद्यान विभाग करीत आहे. यावेळी जमिनीमध्ये खोलवर मुळं घट्ट पकडून ठेवणाऱ्या देशी वाणांचे वृक्ष मुंबईमध्ये लावण्यात येतील असे, महापौरांनी सांगितले.
गतवर्षीप्रमाणे यंदाही २५ हजार इतके वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. चक्रीवादळामुळे विभागनिहाय वृक्षांच्या झालेल्या हानीची नोंद घेऊन या ठिकाणी देशी वाणांचे वृक्ष यावर्षी मोठ्या प्रमाणात लावण्यावर भर देण्यात येणार आहे. उद्यान विभागातर्फे वृक्षारोपणाचा संपूर्ण कार्यक्रम तयार करण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले.
- पालिकेच्या २४ विभागांतील १०६८ भूखंडावरील २२९ उद्याने, ४३२ मैदाने, ३१८ मनोरंजन मैदाने तसेच इतर ८९ याठिकाणी ( मियावाकी पद्धत वगळून) एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
- मियावाकी पद्धतीने तीन लाख ६४ हजार ८१६ इतकी झाडे लावण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन लाख २१ हजार ४०५ इतके झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
- २०१९ च्या वृक्षगणनेनुसार एकूण २९ लाख ,७५ हजार २८३ इतके वृक्ष अस्तित्वात आहे. त्यापैकी रस्त्यालगतची एक लाख ८५ हजार ३३३ झाडे आणि उद्यानातील एक लाख एक हजार ६७ झाडे आहेत.