आता तिसावं वरीस धोक्याचं...

By admin | Published: January 10, 2016 03:33 AM2016-01-10T03:33:46+5:302016-01-10T03:33:46+5:30

टार्गेट्स, डेडलाइन, स्पर्धा, पैसे, नातेसंबंध, मोठी स्वप्ने, जडलेली व्यसने या सगळ्यांत तरुण पिढी गुरफटून गेली आहे. चांगल्या भविष्यासाठी सतत झटणारी ही पिढी स्वत:चे आरोग्य

Now threaten to th ... | आता तिसावं वरीस धोक्याचं...

आता तिसावं वरीस धोक्याचं...

Next

मुंबई : टार्गेट्स, डेडलाइन, स्पर्धा, पैसे, नातेसंबंध, मोठी स्वप्ने, जडलेली व्यसने या सगळ्यांत तरुण पिढी गुरफटून गेली आहे. चांगल्या भविष्यासाठी सतत झटणारी ही पिढी स्वत:चे आरोग्य धोक्यात टाकते आहे. त्यामुळे वीसएक वर्षांपूर्वी पन्नाशी- साठीनंतर जडणारे आजार हे आता अवघ्या तिशीत तरुणांना गाठत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
वय वाढल्याने मानवी शरीरात बदल होत जातात. शरीराची कार्यक्षमता कमी होत गेल्यामुळे विविध व्याधी उतारवयात जडतात. तारुण्यात शारीरिक क्षमता उत्तम असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच आजार जडत आहेत. शुक्रवारी डॉ. अमोल पंपतवार या तीस वर्षीय डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या डॉक्टरला कोणतेही व्यसन नव्हते. त्याच्या कुटुंबीयांना हृदयविकाराचा आजार नव्हता. डॉ. अमोल यांच्याप्रमाणेच अनेक तरुण हे हृदयविकार, मधुमेहाच्या विळख्यात अडकलेले आहेत. गेल्या १० वर्षांत हृदयविकारतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञांकडे तिशीतील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांच्या म्हणण्यानुसार, तरुणांना जडलेली व्यसने ही अत्यंत घातक आहे. ३०-३५ वयोगटात जडणाऱ्या हृदयविकाराला धूम्रपान हे महत्त्वाचे कारण आहे. महाविद्यालयात गेल्यावर अनेक तरुण-तरुणी व्यसनांच्या आहारी जातात. त्यात धूम्रपानाच्या व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर मद्यपान केले जाते. आयुष्यातील ताण वाढलेला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे स्थूलतेचे प्रमाण वाढते. स्थूलपणामुळेही अनेक आजार जडतात. स्थूलपणा वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेकांचे काम बैठे असते. संगणकासमोर तासनतास बसून राहतात. शारीरिक हालचाल नसते. स्थूलता वाढल्याने हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार जडतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. केरकर यांनी स्पष्ट केले.
तरुणांना होणारे आजार हे जीवनशैलीमुळे जडत आहेत. याविषयाची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्या देशात आजार जडण्याची वयोमर्यादा १० वर्षांनी कमी आहे. त्यातच आयुष्यात वाढलेल्या तणावामुळे आजार जडण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. गेल्या दहा वर्षात हा प्रश्न गंभीर झाला आहे. केंद्रीय सरकारने असंसर्गजन्य आजारांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब या आजारांविषयी एक धोरण आखले पाहिजे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश शिवणे यांनी व्यक्त केले.

आजार टाळण्यासाठी हे करा
दिनक्रम आखा- उठण्याची-झोपण्याची वेळ ठरवा, जेवणाच्या वेळा निश्चित करा, व्यायाम करा- रोज सकाळी किमान अर्धा तास चालणे अथवा जॉगिंग करणे, योगसाधना करणे, जीममध्ये जाऊन वर्क आऊट करणे, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करणे.
पौष्टिक आहार घ्या - कामाच्या अतिरिक्त तासांमुळे अनेक जण एका वेळचे जेवण बाहेर करतात. अनेकदा पिझ्झा, बर्गर, पास्ता, नूडल्स असे जंक फूड खाल्ले जाते किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. हे अन्नपदार्थ कटाक्षाने टाळा. त्याऐवजी पालेभाज्या, कोशिंबीर, सलाड, कडधान्य असे पौष्टिक जेवण घ्या. घरचे अन्नपदार्थ खावेत.
ताण कमी करा - वाढत्या शहरीकरणामुळे कामाच्या पद्धतीत बदल झाले आहेत. त्यामुळे कामाचे तास आणि कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळेच मानसिक ताण वाढतो. मानसिक ताण कमी करण्यासाठी आवडत्या गोष्टी म्हणजे गाणी ऐकणे, वाचन, नृत्य या गोष्टी करा. कुटुंबीयांशी, मित्र-मैत्रिणींशी भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा.

तिशीत जडणारे आजार
हृदयविकार, रक्तदाब,मधुमेह, स्थूलता, मानसिक ताणतणाव

आजाराची प्रमुख कारणे
धूम्रपान, मद्यपान, बदललेली जीवनशैली, जंक फूड, खाण्याच्या अनियमित वेळा, व्यायाम नाही, बैठे काम, कमी तास झोप, स्थूलता, कामाचा अतिरिक्त ताण, कोलेस्ट्रॉल वाढणे.

Web Title: Now threaten to th ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.