आता अॅपवर वाहतुकीची माहिती
By admin | Published: July 1, 2015 01:08 AM2015-07-01T01:08:28+5:302015-07-01T01:08:28+5:30
वाहनांची वाढलेली संख्या, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी, यातून पर्यायी मार्गांचा वाहनचालकांकडून होणारा शोध या आणि अशा अनेक माहितींसाठी ‘मुंबई ट्रॅफिक अॅप’ सेवेत येत आहे.
मुंबई : वाहनांची वाढलेली संख्या, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी, यातून पर्यायी मार्गांचा वाहनचालकांकडून होणारा शोध या आणि अशा अनेक माहितींसाठी ‘मुंबई ट्रॅफिक अॅप’ सेवेत येत आहे. या अॅपचे अनावरण मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. या वेळी वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव गौतम चॅटर्जी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या अॅपची सध्या चाचणी सुरू असून ते दहा दिवसांत मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
सध्या मुंबई शहर आणि उपनगरात ३0 लाखांपेक्षा अधिक वाहने रस्त्यावर धावत असून या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी केवळ साडेतीन हजार वाहतूक पोलीस आहेत. वाहतूककोंडीतून वाहनांची सुटका करणे, त्यांना पर्यायी मार्ग उलब्ध करून देणे, वाहतुकीचे नियम आणि सूचना करणे, त्यांच्याशी संपर्क साधणे आदी कामे वाहतूक पोलिसांना करावी लागतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड ताण पडतो. हे पाहता वाहन चालकांच्या मदतीसाठी मुंबई ट्रॅफिक अॅप आणण्यात आल्याचे या वेळी वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. ट्रॅफिक जाम, पर्यायी मार्ग, वाहतुकीचे नियम याची माहिती अॅपवर देतानाच मुंबईत पार्किंगसाठी कोणत्या ठिकाणी जागा शिल्लक आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम अशी माहिती अॅपवर असेल, असे त्यांनी सांगितले. मुंबई वाहतूक पोलीसांच्या माध्यमातून हे अॅप येत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून तीन आठवड्यांची एक मोहीम राबवण्यात येणार असून यात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून रस्त्यावरील खासगी वाहनांची गर्दी कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे कोट्यवधीची दंडात्मक रक्कम वाहतूक पोलिसांकडे जमा होत आहे. त्यातच नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करताना पावती न फाडताच तडजोड करतात. त्यामुळे आणखी दंड तिजोरीत जमा होत नाही. हे पाहता ई-चलान सुविधा वाहतूक पोलिसांकडून आणली जाणार आहे. दंडाची रक्कम ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरण्याची नवी योजना राबविली जाणार असून ती दहा दिवसांत येणार आहे.
शहर आणि उपनगरात
अपघात होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघात कसा झाला, कोणाच्या चुकीमुळे झाला, त्याचे नेमके कारण काय, वाहनाची वेगमर्यादा किती होती यासह अनेक गोष्टींची तपासणी करण्यासाठी क्रॅश अॅनालिसिस कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे.