लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागील अर्थकारण थांबविण्यासाठी आणि बदल्यांमधील गोंधळ दूर करण्यासाठी या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी एक ॲप तयार केले जाणार असून, आरोग्य विभागातील सगळ्याच बदल्या ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुुळे बदल्यांसाठी दिली जाणारी शिफारस पत्रे यापुढे चालणार नाहीत.
राज्यात सध्या शिक्षकांच्या बदल्या पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने केल्या जातात. त्याच धर्तीवर आता आरोग्य विभागातील बदल्याही ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत. ज्याला बदली हवी आहे त्या कर्मचारी, अधिकाऱ्याने स्वतः बदलीचे तीन पर्याय या ॲपवरती द्यायचे आहेत. त्यातून डिजिटल पद्धतीने मेरिटवरती बदली होणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
राज्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या यंदा काही अडचणी आल्यामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे आरोग्य विभागातील बदल्या सुरू झाल्या तर त्या नियमित सुरू राहतील का हा प्रश्न आहे.
आरोग्य विभागात अ दर्जापासून ते ड दर्जापर्यंत म्हणजेच संचालकपदापासून एमबीबीएस डॉक्टर, उपजिल्हा रुग्णालयातील नर्सेसपर्यंतच्या बदल्या ऑनलाइन करणार आहोत, कोणाची चिठ्ठी नाही की वशिला नाही. नियमाप्रमाणे तीन वर्षे झाली असेल तर बदली केली जाईल.- तानाजी सावंत, आरोग्य मंत्री
नोकर भरतीसाठी नवीन धोरणआरोग्य विभागातील भरतीसाठीही नवीन धोरण राबविले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील नोकर भरतीची प्रक्रिया राबवणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस, एमकेसीएलसारख्या कंपन्यांची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.