मुंबई : आधारशी संबंधित कुठलेही काम आता पोस्टामध्ये करणे शक्य आहे. यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. जनतेला आधार अपडेट करण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची गरज नाही. शिवाय त्यांचा वेळ वाचणार आहे. नवीन आधार कार्ड काढणे मोफत असून, नाममात्र शुल्कात आधार अपडेट, लिंक केली जाणार आहेत. याचा फायदा ज्येष्ठ नागरिक, कामगार गावातील महिलांना होणार आहे. या सर्व सुविधा आता पोस्टातच मिळणार आहेत.
आधार कार्ड काढण्यासाठी जन्माचा दाखला, तसेच आई किंवा वडिलांचे आधारकार्ड सोबत आणावे आणि ज्यांचे आधार कार्ड काढायचे आहे, त्यांनी स्वतः येणे गरजेचे आहे. त्याचे नवीन आधार कार्ड मोफत काढण्यात येणार आहे.
आधार कार्ड सध्याच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. शिवाय तुमच्या आधार कार्डावरील तपशील अपडेटेड असणेही आवश्यक आहे. वेळोवेळी याबाबत ग्राहकांना सूचित करण्यात येत आहे. आधार कार्डवरील मोबाइल क्रमांक अपडेट करायचा असेल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ही सेवा अगदी दारापर्यंत दिली जात आहे. आधार कार्डवरील मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची सुविधा लाँच केल्याची घोषणा केली आहे.
गावातच सुविधा : आधार कार्डसाठी तालुका ठिकाणी किंवा शहरात जाण्याची गावातील व्यक्तीला गरज राहिलेली नाही. आधार कार्डसाठीची होणारी पायपीट आता थांबली आहे. अगदी आपल्या गावातच ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
आधार कार्ड काढून दहा वर्षे झाली असेल आणि ते अपडेट करायचे असल्यास तुम्हाला इतरत्र जाण्याची किंवा जास्तीचे पैसे खर्च करण्याची गरज नाही, पोस्टमन तुमची कामे करून देणार आहे.