Join us

गाजर धुण्यासाठी आता यंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:48 AM

क्रांतिसिंह नाना पाटील मंडईचा पुढाकार; स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील गाळेधारकांनी स्वत:हून पुढाकार घेत, गाजरे धुण्यासाठी साधेसोपे व वैशिष्ट्यपूर्ण यंत्र तयार केले असून, त्याचा दैनंदिन वापरही सुरू केला आहे. अशा प्रकारच्या यंत्रांचा वापर महापालिकेच्या अन्य मंडईत व्हावा, यासाठी संबंधिताना सूचना देण्यात आल्या आहेत.

वारंवार सूचना देऊनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून गाजरे इत्यादी यथायोग्य प्रकारे धुणार नाहीत, अशांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बाजार खात्याच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. दादर पश्चिम परिसरातील महापालिकेच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमधील कामगारांनी पायाने गाजर धुतल्याचा व्हिडीओ १२ आॅगस्ट, २०१९ रोजी व्हायरल झाला होता. त्यानंतर, महापालिकेद्वारे करण्यात आलेली कारवाई आणि गाळेधारकांच्या विशेष बैठका घेऊन केलेले आवाहन, साधलेल्या संवादाचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. या घटनेची दखल घेत, महापालिकेच्या बाजार खात्याद्वारे दोषींवर तत्काळ कारवाई केली होती. या अंतर्गत १४ गाळेधारकांवर नोटीस बजावण्यासह ११ गाळेधारकांना प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. त्याचप्रमाणे, पायाने गाजर धुताना वापरण्यात आलेले २० ड्रमदेखील महापालिकेच्या पथकाद्वारे तत्काळ जप्त करण्यात आले होते.

टॅग्स :मुंबई