आता मुंबईकरांच्या घरात ‘ओझं’चे प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:23 AM2018-05-04T02:23:47+5:302018-05-04T02:23:47+5:30

रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत ‘ओझं’ असे म्हणत थिएटर प्लेमिंगो ग्रुप मुंबईतील घराघरांमध्ये जाऊन नाटक सादर करीत आहे.

Now the use of 'Oz' in Mumbaikar's house | आता मुंबईकरांच्या घरात ‘ओझं’चे प्रयोग

आता मुंबईकरांच्या घरात ‘ओझं’चे प्रयोग

Next

अजय परचुरे 
मुंबई : रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत ‘ओझं’ असे म्हणत थिएटर प्लेमिंगो ग्रुप मुंबईतील घराघरांमध्ये जाऊन नाटक सादर करीत आहे. हे नाटक बघण्यासाठी तुम्हाला कोणत्याही नाट्यगृहाची वाट धरावी लागणार नाही, तर अख्खे नाटक च तुमच्या घरी येणार आहे. नाटकांना सध्या पूर्वीसारखी गर्दी होत नाही. कामाच्या व्यापातून कोणी आवर्जून नाटक बघायला जात नाही. अशावेळी नाटकच तुमच्या घरी आले तर.. या विचारातून हा आगळा-वेगळा प्रयोग ‘थिएटर प्लेमिंगो ग्रुप’ने सुरू केला आहे.
‘घराघरांत नाटक’ ही संकल्पना विनायक कोळवणकर या तरुणाची आहे. तर केतन जाधव या तरुणाने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या ग्रुपने याआधी गावागावांत जाऊन हे प्रयोग केले आहेत. त्यानंतर गोव्यातल्या एका वाडीमध्ये दीड महिना राहून त्यांनी गावकऱ्यांसोबत नाटक बसवले होते. सध्या ते मुंबईमध्ये प्रयोग करीत आहेत. विशेष म्हणजे ही मंडळी विनामूल्य ‘ओझं’ हे नाटक सादर करतात. आत्तापर्यंत या नाटकाचे गिरगाव, भोईवाडा, वडाळा, वाशी परिसरातील घरांमध्ये १८ प्रयोग झाले आहेत. या नाटकाची खासियत म्हणजे नाटक सादर करायला ज्यांनी आमंत्रण दिले असेल त्या घरी जाऊन ही मंडळी त्या घराच्या रचनेनुसार नाटकाचे नेपथ्य सजवतात. नाटक सादर करण्याच्या दोन दिवस आधी त्या इमारतीमधील आसपासच्या रहिवाशांनाही नाटक पाहायला येण्यासाठी आवाहन करण्यात येते.
आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या कथासंग्रहातील ‘ओझं’ या कथेचे नाट्य-रूपांतर करण्यात आले आहे. ‘ओझं’ या नाटकाला अनेक घरांतून निमंत्रण येत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येविषयी आपण बºयाच ठिकाणी वाचतो, ऐकतो, बघतो पण नेमका शेतकरी आत्महत्येपर्यंत कसा पोहोचतो व त्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतो याचा अनुभव ‘ओझं’ पाहिल्यानंतर येतो.
दिग्दर्शक सुमेध म्हात्रे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचं व्यवस्थापन भूषण पाटील आणि शंतनु अडसुळ हे दोन तरुण करतात. हे नाटक एकपात्री असून, अभिनेता सूरज कोकरे हा कलाकार या नाटकात भूमिका करतो. सूरज हा महर्षी दयानंद महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने महाविद्यालयाच्या अनेक एकांकिकांमधून कामे केली आहेत.

आपल्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठ्या पण आत्महत्या केलेल्या शेतकरी भावाशी प्राध्यापक भावाने केलेला संवाद असे या नाटकाचे स्वरूप आहे. नाटकात काहीही विलक्षण घडत नाही किंवा कुठेही धक्का देणारे प्रसंग नाहीत, तरीही अगदी पहिल्यापासून हे नाटक उद्ध्वस्ततेचा एक भयाण अनुभव देते. थोरला भाऊ शेती करणारा, पण पावसाअभावी शेतीतून उत्पन्न काहीच नाही; उलट मातीत घातलेले मातीतच जाण्याची भीती,धाकटा कुटुंबाला लागेल तशी मदत आत्मीयतेने करीत राहतो. परस्परांवर कमालीचा जीव असलेल्या दोघा भावांचे भावबंध असे उलगडत जातात की, त्यातून कौटुंबिक जिव्हाळा, नात्यांची घट्ट वीण या साºयांचे एक चित्र समोर उभे राहते.

Web Title: Now the use of 'Oz' in Mumbaikar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.