Join us

आता पालिकेच्या डायलिसिस केंद्रांवरही लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी पालिका डायलिसिस केंद्रांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी पालिकेने केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी पालिका डायलिसिस केंद्रांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी पालिकेने केली आहे. मुंबईतील राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांशी जोडलेल्या डायलिसिस केंद्रांनाच लसीकरण केंद्रे बनवले जाईल. केंद्र सरकारने काही डायलिसिस केंद्रांची यादीही पालिकेकडे पाठवली आहे.

कोरोनाची लस सध्या मुंबईतील ४३ केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील वृद्ध आणि आजारी रुग्णांना दिली जात आहे. या ४३ केंद्रांपैकी २२ केंद्रे महापालिकेची आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, आता मुंबईतील डायलिसिस सेंटर लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. याचा सर्वात मोठा फायदा त्या डायलिसिस रुग्णांना होईल, जे डायलिसिससाठी तेथे जातात. गोमारे यांच्या म्हणण्यानुसार, पीएमजेवाय, एमपीजेवायए आणि सीजीएचएस सरकारी आरोग्य योजनांशी जोडलेल्यांच केंद्रांना लसीकरण केंद्र म्हणून तयार केले जाईल. लसीकरणाला परवानगी देण्यापूर्वी ही केंद्रे लसीकरणाच्या कामासाठी योग्य आहेत की नाही, याची खात्री केली जाईल.

या केंद्रांमध्ये लसीचा साठा, लसीकरणानंतर आवश्यक असलेली प्रतीक्षा रुम, निरीक्षणाचे क्षेत्र, लसीसाठी योग्य जागा आणि लसीच्या दुष्परिणामांबाबत रुग्णांवर उपचार करण्याच्या सुविधा डायलिसिस केंद्रांवर आहेत की नाही? या सर्वांचा आढावा घेतल्यानंतरच तेथे लसीकरणाचे काम सुरू होईल.

दरम्यान, मुंबईतील लसीकरणाचा वेग आणि संख्या वाढावी यासाठी पालिकेकडून दोन शिफ्टमध्ये काम केले जाईल. त्यामुळे, नागरिकांनी आणि कोविन पोर्टलने साथ दिली तर येत्या काही दिवसांत लसीकरणाची गती वाढलेली पाहायला मिळेल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

....................................