Join us  

आता मोहरा मंडळांकडे

By admin | Published: October 13, 2014 3:44 AM

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्या संध्याकाळपर्यंतच अवधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्या संध्याकाळपर्यंतच अवधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे. यासाठी उमेदवारांनी मतदारसंघातील गणेशोत्सव, नवरात्री आणि दहीहंडी मंडळांकडे मोर्चा वळवला आहे. सकाळपासून सुरू असलेला प्रचार संपल्यानंतर रात्री या मंडळांसोबत गुप्त बैठका आयोजित केल्या जात असून, यात मतदानाच्या दिवशीची रणनीती आखली जात आहे. १५ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून, १३ आॅक्टोबर रोजी प्रचाराची अखेर होत आहे. त्यामुळे मागील शनिवार आणि रविवारी या विकेण्डमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. उमेदवारांकडून बड्या नेत्यांसह प्रचार फेऱ्या, बाईक रॅली, रोड शोदेखील आयोजित करण्यात आले. येत्या बुधवारी या उमेदवारांचे भवितव्य मतदारराजा मतपेट्यांत बंद करणार आहे. त्यामुळे आपल्या बाजूने सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी उमेदवारांकडून ‘व्यूहरचना’ आखली जात आहे. यासाठी आपल्या मतदारसंघातील गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि दहीहंडी मंडळांना हाताशी धरण्यात आले आहे. प्रचार फेऱ्या आणि सभांनंतर या मंडळांसोबत रात्री बैठका घेतल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांत तर अशा बैठका बऱ्याच वाढल्या आहेत. उमेदवारांच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत गुप्त बैठका होत असून, मोठ्या प्रमाणात मंडळातील कार्यकर्ते उमेदवारांच्या कार्यालयांत बसलेले दिसत आहेत. (प्रतिनिधी)