मुंबई : नो पार्किंगमध्ये उभ्या वाहनांना टो करताना बऱ्याचदा वाहनांवर ‘ओरखडे’ पडतात, पण यातून सुटका करण्यासाठी व वाहनांना जराही ओरखडे पडू नयेत, यासाठी वाहतूक पोलिसांनी अत्याधुनिक अशा ८० टोइंग व्हॅन ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या टोइंग व्हॅनची प्रात्यक्षिके मंगळवारी वाहतूक पोलिसांकडून मुख्यालयात सादर करण्यात आली. मुंबईत पार्किंगची समस्या मोठी असून, त्यामुळे नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास, वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत वर्षाला हजारो केसेसची नोंद होते. मात्र, दुचाकी आणि चारचाकी वाहने टोइंग व्हॅनमार्फत उचलून नेताना वाहनांना बऱ्याचदा ओरखडे पडतात. वाहनांना कोणत्याही प्रकारे ओरखडे पडू नयेत आणि ते व्यवस्थित उचलून नेता यावे, यासाठी ८० अत्याधुनिक टोइंग व्हॅन नोव्हेंबरपर्यंत ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दिली. या व्हॅनवर उद्घोषणा यंत्रणा, जीआरपी, कॅमेरा, सर्च लाइट बसवण्यात आले आहेत. एखादे वाहन उचलण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर त्याचे चित्रीकरण कॅमेऱ्याद्वारे होईल. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी उचलणाऱ्या अशा दोन प्रकारच्या टोइंग व्हॅन उपलब्ध आहेत. सध्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात ९४ टोइंग व्हॅन आहेत. आता त्यांच्यासोबत नव्या टोइंग व्हॅनही मदतीला येतील, अशी माहिती भारांबे यांनी दिली. दसरापर्यंत दहा आणि त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व व्हॅन दाखल होतील. सध्या नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास टोइंग व्हॅनद्वारे वाहन उचलून जवळच्याच वाहतूक पोलीस चौकीत नेण्यात येते. त्या सर्व प्रक्रियेत दोन प्रकारचा दंड भरावा लागतो. यात टोइंगसाठीचे दर दुचाकीसाठी १०० रुपये, तर चारचाकीसाठी २०० रुपये आहेत, तर वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगचा २०० रुपये दंड आकारला जातो. यामध्ये नवीन टोइंग व्हॅन दाखल होताच, त्याच्या दरात दसऱ्यापासून वाढ केली जाणार आहे. दुचाकीसाठी २०० तर चार चाकीसाठी ४०० रुपये आकारले जातील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)