लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीनंतर अद्यापही ७५ हजार विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. मात्र शहरातील अनेक नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी उपलब्ध जागा मात्र भरल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात प्रत्यक्षात नाही मात्र ऑनलाइन पद्धतीने तरी अकरावीचे वर्ग सुरू करण्याच्या तयारीत महाविद्यालयीन प्राचार्य व संस्थाचालक आहेत. विशेष म्हणजे प्रवेश निश्चित केलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही किमान ऑनलाइन वर्ग सुरू होऊन अभ्यासक्रम सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे.
काेरोना टाळेबंदी आणि त्यानंतर मराठा आरक्षणातील पेच यामुळे चार महिन्यांपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता सुरळीत झाली असून, नामांकित महाविद्यालयांतील ७५ टक्के जागांवरील प्रवेशही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन व शासनाच्या शैक्षणिक संस्था प्रत्यक्षात सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना येत नाहीत तोपर्यंत ऑनलाइन अभ्यासक्रम नियोजन, आढावा यांसदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, अशी मते प्राचार्य व्यक्त करत आहेत.
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली असली तरी किती टक्के पालक आपल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पाठवतील, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असल्याने अभ्यासक्रम संपवण्याचे आव्हानही प्राचार्य व शिक्षकांपुढे आहे. या कारणास्तव ऑनलाइन वर्ग सुरू करून बारावीच्या वर्षास जुळवून घेण्यासाठी येत्या ४ ते ५ महिन्यांत अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षण संस्थांना त्यानुसार ऑनलाइन वर्गांचेही नियोजन करावे लागेल.
.....................