Join us

आता प्रतीक्षा दुसऱ्या यादीची; अकरावीची पुढची गुणवत्ता यादी १२ ऑगस्टला जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 6:18 AM

पहिल्या प्रवेश फेरीमध्ये केवळ ६७ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी वेट अँड वॉचचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीतील प्रवेशासाठीची मुदत संपली आहे. आता दुसरी गुणवत्ता यादी १२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ  ४८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर, ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही प्रवेश निश्चित न केल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये केवळ ६७ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी वेट अँड वॉचचा निर्णय घेतला आहे. 

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत मुंबई विभागातील एकूण १ लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यातील ८१ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारले असून, १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. याशिवाय ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी तर निवड होऊनही प्रवेश घेतलेच नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  कला शाखेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. वाणिज्यच्या ४१ टक्के तर विज्ञान शाखेच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केले आहेत.

कोट्यातील प्रवेश 

पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंत इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन या राखीव कोट्यांतील मिळून २४ हजार ७८८ प्रवेश झाले आहेत. यामध्ये कला शाखेसाठी २ हजार ४३९, विज्ञान शाखेसाठी ८ हजार ४०२, वाणिज्य शाखेसाठी १३ हजार ८३२, तर एचएसव्हीसीसाठी ११२ प्रवेश निश्चित झाले आहेत. 

दुसऱ्या  फेरीसाठी  नियोजन ७ ते ९ ऑगस्ट : नवीन अर्ज भाग १ भरणे, भाग २ पसंतीक्रम भरणे१२ ऑगस्ट : दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे १२ ते १७ ऑगस्ट : पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे 

पहिल्या पसंतीच्या १२ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला 

पहिल्या फेरीत सुमारे ६१ हजार ७३५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यातील केवळ ४९ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केले आहेत. ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. तर, तब्बल १२ हजार २१९ विद्यार्थी प्रवेशासाठी महाविद्यालयांत पोहोचले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश प्रतिबंधित केला जाऊन त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या २१ हजार ६९० पैकी ८ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केले आहेत. तर, १२ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी या प्रवेशांकडे पाठ फिरवली आहे. तिसऱ्या क्रमांकाचे पसंतीचे महाविद्यालय मिळूनही १० हजार ७९३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले नाहीत.

 

टॅग्स :विद्यार्थीमहाविद्यालयमहाराष्ट्रमुंबई