आता भिंत खचलीय; उद्या इमारत कोसळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:44 AM2018-06-26T02:44:13+5:302018-06-26T02:44:17+5:30

वडाळा येथील विद्यालंकार महाविद्यालय रोडजवळील लॉइड इस्टेट (वडाळा हाइट्स को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी)च्या ‘सी’ आणि ‘डी’ विंगच्या पार्किंगचा भाग व कपाउंडची भिंत सकाळी ४ वाजेच्या दरम्यान खचली.

Now the wall has collapsed; The building will collapse tomorrow! | आता भिंत खचलीय; उद्या इमारत कोसळेल!

आता भिंत खचलीय; उद्या इमारत कोसळेल!

Next

मुंबई : वडाळा येथील विद्यालंकार महाविद्यालय रोडजवळील लॉइड इस्टेट (वडाळा हाइट्स को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी)च्या ‘सी’ आणि ‘डी’ विंगच्या पार्किंगचा भाग व कपाउंडची भिंत सकाळी ४ वाजेच्या दरम्यान खचली. दोस्ती रिअ‍ॅलिटी कंपनीच्या बांधकामामुळे येथील भाग खचला, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता येथील संरक्षक भिंत कोसळली आहे; उद्या इमारत कोसळेल. तोवर प्रशासन गप्प बसणार का? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
वडाळा येथील दुर्घटनेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त रहिवाशांनी ‘लोकमत’ने संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, पार्किंगच्या भागात गाड्या उभ्या होत्या. या दुर्घटनेत त्या गाड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. पार्किंगचा भाग कोसळल्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश रहिवाशांनी सावधानी बाळगून घरे खाली केली आहेत.
दोस्तीचे खोदकाम सुरू असल्याने आणि त्यात रविवाराच्या मुसळधार पावसाने लॉइड इस्टेटच्या पार्किंगचा भाग खचला. दोस्तीकडून खोदकाम आणि बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू होते. कंपनीने सिमेंट मिक्सिंगचे काम उभारले आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी जमिनीखाली गेले आणि जागा खचली. सिमेंट मिक्सिंग प्लँटमुळे ड्रेनेज लाइन तुंबली. परिणामी, पाण्याचा निचरा होण्यास जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे एका दिवसाच्या पावसाने इमारतीच्या गेटबाहेर पाणी साचल्याचे दिसून आले. येथील इमारती एकूण ३२ माळ््याच्या असून २४० फ्लॅट आहेत. या इमारतीत हजारोंच्या संख्येने रहिवासी राहत आहेत.

बांधकाम बंद करा
दोस्ती रिअ‍ॅलिटी कंपनीचे बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे, असे म्हणणे स्थानिकांनी मांडले आहे. लोकप्रतिनिधींनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यांनीही येथील बांधकाम बंद करण्याता यावे, अशी मागणी केली आहे. आता वेळीच कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

मागील दोन वर्षांपासून दोस्तीचे काम सुरू आहे. त्यांच्या या कामामुळे इमारत परिसरात अनेक वेळा तडे पडले आहेत. हे काम बंद करण्यासाठी अनेक वेळा त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी काम थांबविले नाही. त्यामुळे सोमवारीची घटना घडली. आता फक्त पार्किंगचा भाग कोसळला आहे. पूर्ण इमारत कोसळण्याची शक्यता आहे.
- ए. आर. बॅनर्जी, रहिवासी.

पहाटेच्या वेळी अचानक मोठा आवाज झाला. काही कळायला मार्ग नव्हता. खिडकीबाहेर बघितल्यावर घटना समजली. दोस्ती रिअ‍ॅल्टीचे काम सुरू असल्यामुळे ही घटना झाली आहे. येथे अनेक गाड्या जमीनदोस्त झाल्या आहेत.
- तानिया मोहांते, रहिवासी.

दोस्ती बिल्डरच्या चुकीमुळे येथील भाग खचला आहे. पोलिसात गेल्यावर पोलिसांकडून बऱ्याच वेळा नंतर एफआरआय नोंदविण्यात आला. या इमारतीत हजारोंच्या संख्येने लोक राहत असल्याने, त्यांच्या राहण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- सिमरन तरमार, रहिवासी.

लॉइड इस्टेट येथे अत्यंत गंभीर घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास सर्व सोसायटीवाले मॉर्निंग वॉकसाठी फिरत असतात. पार्किंगचा भागच कोसळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीतील लोकांचे नुकसान झाले आहे.
- मनोज शुक्ला, रहिवासी.

Web Title: Now the wall has collapsed; The building will collapse tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.