मुंबई : मेट्रो ३ प्रकल्पामुळे आणखी एक वादाची ठिणगी सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीमध्ये पडली आहे़ या प्रकल्पात बाधित आरे कॉलनीतील २५४ वृक्षांचा बळी देण्याच्या प्रस्तावाला शिवसेना विरोध करीत आहे़ त्याचवेळी भाजपाने विकासाचा सूर लावला आहे़ त्यामुळे प्रशासनाने घटनास्थळाच्या पाहणीसाठी हा प्रस्ताव लांबणीवर टाकला आहे़कुलाबा ते सांताक्रूझ मेट्रो ३ या प्रकल्पासाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्यात येणार आहे़ मात्र या प्रकल्पाच्या मार्गात वृक्षांची बाधा ठरत असल्याने तब्बल २५४ वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी आज आला़ यामध्ये २ हजार ४४ वृक्षांच्या पुनर्रोपणाचाही प्रस्ताव आहे़ मात्र याचे तीव्र पडसाद वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत उमटले़ २०४४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी पुरेशी जागा तिथे नाही़ त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने या प्रकल्पाचे सादरीकरण करावे, अशी मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली़ त्याचवेळी सदस्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळावे; परंतु विकासाचा मुद्दा लक्षात ठेवून हा प्रस्ताव पुढे नेण्याचा सूर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी लावला आहे़ या प्रकल्पात गिरगावमधील काही इमारती पाडाव्या लागणार आहेत़ यावर तीव्र पडसाद काही दिवसांपूर्वी उमटले होते़ या प्रकल्पावरून वाद सुरू असल्याने पालिका प्रशासनाने आरे कॉलनीत प्रस्तावित कारशेडच्या जागेची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे़मेट्रो कारशेडच्या प्रकल्पात बाधित २,२९८ वृक्षांपैकी २,०५४ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे़ मात्र या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच आरे कॉलनीत वृक्ष तोडण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी केला आहे़ या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे़
युतीत आता ‘मेट्रो’वाद
By admin | Published: February 10, 2015 12:22 AM