'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 11:51 PM2021-08-08T23:51:03+5:302021-08-08T23:55:01+5:30

उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर 'भाजपा मुंबई'ने ट्विट केलं आहे.

'Now we have to give another bang'; BJP's warning to Thackeray government | 'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

googlenewsNext

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी एका मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. त्या अॅपबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर 'भाजपा मुंबई'ने ट्विट केलं आहे. रेल्वे बंदी उठवण्याची यांची घोषणा केवळ, भाजपाच्या दणक्यामुळे. बहुधा मंदिर बंदी उठवण्यासाठी आता आणखी एक दणका द्यावा लागेल. शहाण्याला शब्दाचा मार, पण ठाकरे सरकार अतिशहाणे आहे... कुछ समझे?, असं म्हणत भाजपाने राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

दोन दिवसांपूर्वी सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी मुंबईत भाजपाने विविध ठिकाणी आंदोलन केलं होतं. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आलं होतं. तसेच मनसेने देखील लोकल सुरु करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, लसीकरण काही टप्प्यांपर्यंत पूर्ण होत नाही तोवर कोरोनाचे नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत. राज्यातील काही भागात कोरोना आटोक्यात आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा सण उत्सव तोंडावर आहेत. ही सारी परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

काहींनी मंदिरे, हॉटेल, मॉल्स उघडण्याची मागणी केली. याबाबतचा निर्णय येत्या ८ दिवसांत घेण्यात येईल. उद्या टास्क फोर्सची बैठक होत आहे. त्यामध्ये आढावा घेऊन त्यांच्या सल्लामसलतीनंतर मंदिरे, मॉल उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. गर्दी टाळा, गर्दी झाल्यानं रुग्णवाढ होते, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.