लोकमत न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ रंगकर्मी विनय आपटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'विनय आपटे प्रतिष्ठान'च्या वतीने 'मनोरंजनसृष्टी सद्यस्थिती - परिवर्तन एक कसोटी' या विषयावर ऑनलाईनच्या माध्यमातून एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विजय केंकरे, सतीश राजवाडे, सुलेखा तळवलकर, नितीन वैद्य, भरत दाभोळकर, संजय जाधव आदी मनोरंजन सृष्टीतील मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले. अजित भुरे यांनी सूत्रसंचालन केलेल्या या परिसंवादात, कोरोना प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरील मनोरंजन सृष्टीचा आढावा घेतला.
-----------
नाट्यक्षेत्राच्या समस्या या मालिका किंवा चित्रपटांचे शूटिंग वगैरे गोष्टींपेक्षा वेगळ्या आहेत. आता नाट्यगृहे पुन्हा उघडल्यानंतर प्रेक्षक नक्की येतील. नाटक जेव्हा सुरू होईल तेव्हा नाटक घेऊन आता आपण लोकांपर्यंत जायला पाहिजे, असे मला वाटते. नाट्यक्षेत्राने आतापर्यंत खूप स्थित्यंत्तरे पाहिली आहेत. आता पुढच्या काळात नाटकांचे अस्तित्त्व कसे टिकवून ठेवता येईल, याचा प्राधान्याने विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
- विजय केंकरे
गेल्या वर्षीच्या पहिल्या लॉकडाऊनमुळे टीव्ही, नाटक व चित्रपट क्षेत्रावर वाईट परिणाम झाला. अनेक मालिका वाहिन्यांना बंद कराव्या लागल्या. पण, यंदाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी मिळून 'शो मस्ट गो ऑन' असे ठरवत काम केले. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे टीव्हीवर परिणाम झाला नाही. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मला आर्थिक मर्यादेसह समाज म्हणून सांस्कृतिकतेची मर्यादा आहे. मराठी व हिंदी मिळून टीव्हीवर १४३ शो होतात. पंधरा ते वीस हजार लोक यात काम करतात. लॉकडाऊनमध्ये हे लोक बाहेर गेले व त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले.
- नितीन वैद्य
कोणत्याही परिस्थितीवर मात करून 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीनुसार, आपण प्रतिकूल परिस्थितीतही काम करू शकतो, हे आता आपण नक्कीच शिकलो आहोत.
- सतीश राजवाडे
लॉकडाऊन झाला तरी एक कलाकार म्हणून कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत रसिकांचे मनोरंजन करायचे, हे मी नक्की केले होते. त्यामुळे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी एक कार्यक्रम सुरू केला. अनेकांना हा कार्यक्रम आवडला. लाखो लोक त्यामध्ये जोडले गेले. परिणामी प्रायोजकही मिळाले आणि अर्थकारणाला खीळ बसली नाही.
- सुलेखा तळवलकर
जाहिरात किंवा मनोरंजन क्षेत्रात लॉकडाऊनच्या नंतर विशेष फरक पडणार नाही. लोक यातून नक्की बाहेर पडतील आणि सर्वकाही पुन्हा सुरळीत सुरू होईल.
- भरत दाभोळकर