मुंबई - एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल्याने आम्हाला सुखद धक्का बसला आहे. हे पंतप्रधान मोदी, शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीसांमुळे झाले आहे. फडणवीसांनी सत्तेचा त्याग केला, उद्धव ठाकरे हो मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला काहीही बोलायचं नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. तसेच, आमच्यामध्ये कोणीही नाराज नसल्याचे सांगितले. दरम्यान, शिंदे गटात माजी मंत्री बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज बच्चू कडूंनी अधिवेशनात भाषण केले. त्यावेळी, हटके अंदाजात अध्यक्ष महोदयांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने 164 तर प्रस्तावाच्या विरोधात 107 जणांनी मतदान केले. दरम्यान, या निवडीनंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र, सर्वांनीच या निवडीनंतर अध्यक्षांचे अभिनंदन केले. त्यानंतर, अनेकांची भाषणही झाली.
अपंग, अनाथ आणि प्रहारकडून मी आपलं अभिनंदन करतो. आपला कोणता पक्ष होता, कोणत्या पक्षाचे होते, हा विषय महत्त्वाचा नाही. आता, झेंडा सोडून अजेंड्याकडे जावं लागेल. त्याच अजेंड्यातून विकासाची नवीन पाऊलवाट या सभागृहात निर्माण झाली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले. या सभागृहातून सामान्य माणसांचा आवाज निर्माण होणं आणि जनतेपर्यंत पोहोचणं हे अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहातून मंत्रालय चालत नसून मंत्रालयातून सभागृह चालतं हीच यातील खरी मेख आहे, असे म्हणत कडू यांनी सभागृहातील कामकाजावर बोट ठेवले. तसेच, सभागृहातून मंत्रालय चालले पाहिजे, हा दिवस तुमच्या काळात आला पाहिजे, असेही कडू यांनी म्हटले.
सभागृहात अपेक्षांना बोलण्यासाठी अधिक वेळ द्यावा, ज्यांच्या पाठिशी कुणीही नव्हते, फक्त जनता होती, त्यांनाही सभागृहात बोलू द्या, असे म्हणत बच्चू कडू यांनी आपली भूमिका सभागृहात मांडताना नवनिर्वाचित अध्यक्षांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
कुणीही नाराज नाही - केसरकर शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तसे काही नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. यामुळे शिंदेंनी आम्हाला आपल्या कोणालाही मंत्रिपद मिळणार नाही असे जरी सांगितले तरी एकही आमदार मंत्री झाला नाही तरी शिंदेंसोबत असेल, असे म्हणत नाराजीच्या वृत्ताचे दिपक केसरकर यांनी खंडन केले आहे.