ऊर्जामंत्री; आयलँडिंग यंत्रणेच्या बळकटीकरणासह वीजनिर्मितीत हाेणार भरीव वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य भार प्रेषण केंद्राचे आधुनिकीकरण करणे, मुंबई आयलँडिंग यंत्रणा बळकट करणे, विक्रोळी येथे ४०० के.व्ही. उपकेंद्राची स्थापना करणे, मुंबईस्थित वीजनिर्मितीमध्ये भरीव वाढ करणे, कुडूस-आरे येथे १ हजार मे.वॅ.ची अधिकची वीज मुंबई महानगर प्रदेशासाठी उपलब्ध करणे, उरण येथे गॅसवर आधारित वीज उत्पादनाची क्षमता वाढविणे, इत्यादी कामे आता प्राधान्याने केली जाणार आहेत. भविष्यात मुंबई शहरात वीज ठप्प होण्याची घटना घडू नये, मुंबई महानगराला दर्जेदार व पुरेसा वीजपुरवठा २४ तास उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक पावले उचलली जाणार आहेत.
दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या ४०० के.व्ही. वाहिन्यांमधील बिघाडामुळे, मुंबईस्थित वीजनिर्मितीचे प्रमाण कमी असल्यामुळे मुंबई महानगराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन काही तासांसाठी ठप्प झाले होते. याविषयी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन सादर केले. त्यानुसार, विघातक प्रोग्राम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ ट्रोजन हॉर्सनी महापारेषणच्या संगणक प्रणालीत प्रवेश केल्याचे व त्याद्वारे विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. त्यांपैकी काही ट्रोझन हॉर्सेस यांनी यापूर्वीही जगात अशा प्रकारे मोठे सायबर हल्ले केले आहेत. विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयटी व ओटी सर्व्हरच्या फायरवाॅलमध्ये या ट्रोझन हॉर्सेसने सहजतेने प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. एका मिनिटापेक्षा कमी अवधीत ३ अलार्म्स आयटी सिस्टीममधून देण्यात आले. त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, ही बाब सायबर हल्ला झाल्याची शक्यता दर्शविते.
* एसएलडीसीच्या सायबर प्रणालीचे सक्षमीकरण !
आता सज्जता म्हणून सायबर सेलने त्यांच्या अहवालात आयटी व ओटी रचना एकमेकांपासून वेगळे करणे, पासवर्ड मॅनेजमेंट करणे, वेब ॲप्लिकेशन सुरक्षाविषयक प्रणाली अद्ययावत करणे, आयटी व ओटी रचनेचे अद्ययावतीकरण करणे, एसएलडीसीच्या सायबर प्रणालीचे सक्षमीकरण करणे, इत्यादी शिफारशी केल्या आहेत; तर अन्य समित्यांच्या अहवालांमध्ये मुंबई पारेषण यंत्रणेचे सक्षमीकरण करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, इत्यादी शिफारशी केल्या आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.