आता २४ तासांऐवजी १५ मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:08+5:302021-07-15T04:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आता २४ तासांऐवजी १५ मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आता २४ तासांऐवजी १५ मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम राजीवन यांनी सांगितले. हवामान अंदाजांबाबतच्या वाढीव मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले अभिप्राय जाणून घेण्याच्या उद्देशाने आयआयटीएमने पवन आणि सौरउर्जा निर्मितीसाठी हवामानशास्त्रीय भाकीत : सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टिकोन या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते.
डॉ. एम राजीवन म्हणाले, ‘‘भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग यांसारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या संस्था पवन आणि सौर उर्जाविषयक हवामानाचे अंदाज जारी करत असतात. विविध हितधारकांकडून वाऱ्यांचा वेग, ढगांचे आच्छादन आणि सौर किरणोत्सार लहरीच्या अंदाजांची विचारणा होत असते. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित हवामान शास्त्रविषयक भाकिते आणखी अचूक करण्यासाठी भूविज्ञान मंत्रालय २०२१ ते २०२६ या नियोजन कालावधीमध्ये या भाकितांशी संबंधित विविध प्रकारच्या कामांना आणखी बळकटी देणार आहे. नव्या, नूतनक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यासाठी, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक पर्यायांची चाचपणी केली जात आहे. पवन ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी हवामानाचे भाकीत महत्त्वाचे असते. ताशी १५ किमीपेक्षा कमी गतीने वारे वाहणाऱ्या आणि डोंगराळ भागात पवनऊर्जा निर्मितीसाठी हवामानाचे भाकीत अचूक असणे आवश्यक असते. सौर उर्जा निर्मितीसाठी निरभ्र आकाश असताना भाकीत करणे सोपे असते; मात्र ढगाळ वातावरण असताना सूर्यप्रकाशाबाबतचे भाकीत करणे अवघड होते, असेही त्यांनी नमूद केले.