Join us

आता, आमदार बांगर मिशी कधी काढणार? गिफ्ट दाखवत शिवसेनेच्या पौळ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 3:16 PM

कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली

मुंबई/हिंगोली - शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि शिंदे गटातील आक्रमक नेते संतोष बांगर आपल्या वादग्रस्त घटनांमुळे कायम चर्चेत असतात. नुकतेच राज्यातील अनेक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात, आमदार बांगर यांच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील निवडणूकही झाली. या निवडणुकांच्या प्रचारावेळी आमदार बांगर यांनी कळमनुरी येथील १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवणार, १७ जागा जिंकणार नाहीतर मिशी काढेन, असं चॅलेंजच दिलं होतं. मात्र, आता त्यांचा विजयाचा आत्मविश्वास फोल ठरल्याने ते खरंच मिशी काढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतील केवळ ५ जागा मिळाल्या. तर, महाविकास आघाडीने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत निकाल त्यांच्याच विरोधात गेला आहे. महाविकास आघाडीन १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे, या निवडणुकांच्या प्रचारापूर्वी आमदार बांगर यांनी एका सभेत बोलताना, येथे १७ पैकी १७ जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता. विशेष म्हणजे १७ जागा न जिंकल्यास मिशी ठेवणार नाही, असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, त्यांच्या याच विधानावरुन त्यांना प्रश्न केला जात आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्या युवा महिला नेत्या अयोध्या पौळ यांनी व्हिडिओ शेअर करत आमदार संजय बांगर यांना प्रश्न केला आहे. आता, मिशी कधी काढणार? असा प्रश्न पौळ यांनी विचारला आहे. तसेच, मी सकाळीच एक गिफ्ट घेऊन आलेय, त्यासाठी २० रुपयेही खर्च केलेत, असे म्हणत पौळ यांनी व्हिडिओत शेविंग इरेजर आणल्याचं दाखवलंय. त्यामुळे, आता आमदार संतोष बांगर काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :आमदारशिवसेनाहिंगोलीसोशल मीडियाकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक