ऊर्जा प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आता एक खिडकी योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:13 PM2020-07-26T15:13:19+5:302020-07-26T15:14:05+5:30
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी उपलब्ध करून देण्याकरिता लँड बँक तयार करण्यात येणार आहे.
मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी उपलब्ध करून देण्याकरिता लँड बँक तयार करण्यात येणार आहे. यासाठीसाठी लवकरच एका कंपनीची स्थापना करण्यात येणार असून याची संरचना व कार्यप्रणाली या बाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे. प्रकल्प उभे करण्यासाठी व त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.
राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस प्राधान्य देऊन राज्याचे सर्वसमावेशक ऊर्जा धोरण तयार करणार आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच महाऊर्जाचे महासंचालक हे या समितीचे सदस्य राहणार असून ऊर्जा विभागाचे उपसचिव किंवा सहसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश व राजस्थान या शेजारील राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांचा अभ्यास करून शासनास शिफारशी सादर करणार आहे.