आता आधार कार्डाने काढा एटीएममधून पैसे
By admin | Published: April 3, 2016 04:52 PM2016-04-03T16:52:25+5:302016-04-03T18:14:53+5:30
डीसीबी बँकेनं आधार कार्डच्या माहितीच्या आधारे एटीएममधून पैसे काढणारं मशिन लावलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3- डीसीबी बँकेने आधार कार्डाव्दारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये ग्राहक पिन क्रमांकाऐवजी बायोमेट्रीक डिटेल म्हणजेच शारीरीक चिन्हांचा उपयोग करुन आपल्या एटीएम कार्डाचा उपयोग करु शकतो. अशी सुविधा सुरु करणारी डीसीबी देशातील पहिली बँक ठरली आहे.
आधार कार्डावरील माहितीच्या आधारे चालणारे आम्ही देशातील पहिले एटीएम सुरु केले आहे. जिथे तुम्हाला कार्डाशिवाय व्यवहार करता येऊ शकतो अशी माहिती डीसीबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक मुरली नटराजन यांनी दिली.
व्यवहार सुरु करण्यापूर्वी ग्राहकाने पिनऐवजी बारा अंकी आधार क्रमांक टाकावा किंवा कार्ड स्वाईप करावे. याप्रक्रियेमध्ये तुम्ही देत असलेली माहिती खरी आहे हे तपासण्यासाठी तुमच्या बोटांचे ठसे एटीएममशीनच्या स्कॅनरवर स्कॅन होतील.
अनेक बँक खात्यांमुळे अनेकदा पिन क्रमांक लक्षात रहात नाही. त्यासाठी ही नवी पद्धत चांगली आहे. या सुविधेसाठी बँक खात्याला आधार क्रमांकाने जोडणे आवश्यक आहे. सध्या फक्त डीसीबी बँकेच्या कर्मचा-यांसाठी ही सुविधा आहे. बँकेचे ४०० एटीएम नेटवर्कचे जाळे आहे. सर्व एटीएम्सना या सुविधेने जोडण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले आहे.