Join us  

बेस्टचे स्टेअरिंग महिलांच्या हाती! धारावी आगारातून होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 5:52 AM

बेस्ट प्रशासनाने जास्तीत जास्त महिला बसचालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :बेस्ट प्रशासनाकडून कंत्राटी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या बेस्ट बसचे सारथ्य आता महिला चालक करणार आहेत. बेस्ट बसच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बेस्ट बस चालविणार असून, याची सुरुवात धारावी आगारातून केली जाणार आहे. येत्या आठवड्यात धारावीतून या सेवेला सुरुवात होणार असून, त्यानंतर आणखी दोन आगारात महिला बेस्ट बसचालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

बेस्टच्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या कारणास्तव चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असतानाच आता दुसरीकडे बेस्ट प्रशासन बेस्ट बसवर महिला चालकांची नियुक्ती करत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बेस्टच्या माध्यमातून प्रवाशांच्या सेवेसाठी महिला बसचालकांची नियुक्ती केली जाणार आहे. 

मुंबईतल्या तीन आगारांमध्ये प्रथमत: ही नियुक्ती केली जाईल. धारावी आगार यापैकी एक असून, उर्वरित दोन आगारांची नावे लवकर घोषित केली जातील. यासाठी बेस्ट प्रशासनाने जास्तीत जास्त महिला बसचालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

जास्तीत जास्त महिलांना प्रशिक्षण

धारावी आगारातील सेवेसाठी महिला बसचालक म्हणून लक्ष्मी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात धारावी आगारातून लक्ष्मी या महिला बेस्ट बसचालक म्हणून कामावर रुजू होतील. त्यांचे प्रशिक्षण जवळजवळ पूर्ण झाले आहे. शिवाय आणखी महिला बेस्ट बसचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :बेस्टधारावी