महिलांना आता रात्रपाळीची मुभा
By admin | Published: May 21, 2015 02:38 AM2015-05-21T02:38:18+5:302015-05-21T02:38:18+5:30
कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून आता महिला कामगारांना रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे
मुंबई - कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून आता महिला कामगारांना रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, महिला कामगारांच्या सुरक्षेबाबतच्या अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे.
महिला कामगारांना रात्रपाळीत काम करू देण्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले होते. त्यानुसार कारखाने अधिनियमात बदल करण्यात आला आहे. सरकारने काखान्यांच्या व्याख्येतही बदल केला असून ज्या ठिकाणी विजेचा वापर करून १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असतील अथवा विजेच्या वापराविना २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार कार्यरत असतील, अशी आस्थापना म्हणजे ‘कारखाना’ अशी पूर्वीची व्याख्या होती. त्यामध्ये बदल करून आता कामगारांच्या संख्येत अनुक्रमे १० व २० ऐवजी २० व ४० अशी वाढ करण्यात आली आहे. या बदलांमुळे सुमारे १४ हजार ३०० कारखाने या अधिनियमाच्या कक्षेतून कमी होऊन त्याचा लाभ लघुउद्योजकांना होणार आहे. या कारखान्यांमध्ये १ लाख ९० हजार कामगार काम करत आहेत, त्यांच्या संख्येत आता दुपटीने वाढ होऊन अधिकची रोजगारनिर्मिती होऊ शकते, असा दावा कामगार विभागाने केला आहे. (विशेष प्रतिनिधी)
ओव्हरटाईमच्या मर्यादेत वाढ
अधिनियमाच्या कलम ६५ (२) नुसार कामगाराला अतिकालिक (ओव्हरटाईम) काम करण्यासाठी व्यवस्थापनाकडून पूर्व परवानगी घेण्याची अट होती. ती आता रद्द करून अतिकालिक कामाच्या तासाची तिमाही मर्यादा ७५ ऐवजी ११५ अशी करण्यात आली आहे.
भरपगारी रजेसाठी ९० दिवसांची अट
एका वर्षात २४० किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केले तरच भरपगारी रजा मिळते. मात्र ही मर्यादा आता २४० वरून ९० दिवसांची करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक कामगारांना याचा लाभ होणार आहे. आता मुख्य कारखाना निरीक्षक यांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही निरीक्षकाला न्यायालयात तक्रार दाखल करता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.