आता महिलाही चालविणार एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:05+5:302021-03-08T04:07:05+5:30
२१५ महिलांच्या प्रशिक्षणाला सुरुवात; वर्षभरानंतर होणार सेवेत दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटीत २१५ महिलांच्या चालक-वाहक या दुहेरी ...
२१५ महिलांच्या प्रशिक्षणाला सुरुवात; वर्षभरानंतर होणार सेवेत दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटीत २१५ महिलांच्या चालक-वाहक या दुहेरी जबाबदारीच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आदिवासी भागातील २१ महिला आहेत. एसटीमध्ये चालक-वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती करण्यात येईल. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून वर्षभरानंतर त्या सेवेत दाखल होतील, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
एसटीत सध्या ४,५०० महिला वाहक आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्या सेवेत आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करणार आहेत. महिला चालकांची भरती प्रक्रिया साधारण २०१९ मध्ये सुरू झाली. सर्वसाधारण भागांतील १९४ आणि आदिवासी भागातील २१ महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणी घेतल्यानंतरच या महिला चालक २०२१ मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते; परंतु मधल्या काळात काेरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण थांबले हाेते. आता हे प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले आहे. वर्षभरात त्या सेवेत दाखल होतील. पुण्यातील भोसरी येथे एसटीचे मोठे चाचणी पथक असून तेथे अंतिम चाचणी होऊन त्यांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.