Join us

आता महिलांचा स्वतंत्र पक्ष राजकीय रिंगणात मुंबईत घोषणा : ५० टक्के कोट्यासाठी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:33 AM

राजकारणातील स्त्री-पुरुष असमानता कमी करण्याच्या हेतूने या पक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या पुरुषसत्ताक समाजात महिलांचेही समान महत्त्व निर्माण होणार आहे. संसदेमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी महिलांचा दीर्घकाळ लढा सुरू आहे.

मुंबई - महिलांना केंद्रीय राजकारणातही ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी करत नॅशनल वुमन पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे. महिलांना पुरूषांसह समान अधिकार मिळवून देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन या पक्षाची स्थापना केल्याची माहिती पक्षाच्या अध्यक्षा डॉ. श्वेता शेट्टी यांनी दिली. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुका लढवण्याची घोषणा पक्षातर्फे मुंबई प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात अली.यावेळी श्वेता शेट्टी म्हणाल्या की, २०१९च्या लोकसभा निवडणुकांत एकूण जागांपैकी निम्म्या म्हणजेच २८३ जागांवर पक्षातर्फे महिला उमेदवार देण्यात येतील. संसदेमध्ये पुरुषांइतकेच महिलांचे प्रतिनिधीत्व असावे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल आहे. राजकारणातील स्त्री-पुरुष असमानता कमी करण्याच्या हेतूने या पक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या पुरुषसत्ताक समाजात महिलांचेही समान महत्त्व निर्माण होणार आहे. संसदेमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी महिलांचा दीर्घकाळ लढा सुरू आहे. आपल्या समाजात बहुतांश राजकीय निर्णय पुरुषच घेतात आणि संसदेमध्ये महिलांचे समान प्रतिनिधीत्व नाही. त्यामुळे महिला सबलीकरणाची शक्यता कमी होते. या पक्षाच्या उपक्रमाच्या माध्यमातून, महिलांच्या संपूर्ण विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिलांचा पक्ष असला, तरी पुरूष सदस्यांची पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून नोंदणी केली जाणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. ज्या पुरूषांचे या मुद्द्याला समर्थन असेल, अशा पुरूष उमेदवारांना ५० टक्के उमेदवारी देणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये युथ पार्लमेंट (महिलांसाठी राजकीय शाळा) सुरू करणार असल्याचे पक्षाने सांगितले. या उपक्रमाद्वारे राजकारणातील प्रत्यक्ष व शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाणार असून राजकीय प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी महिलांनी उत्तेजन दिले जाणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली.

कोण आहेत श्वेता शेट्टी?श्वेता शेट्टी या एमबीबीएस डॉक्टर आहेत. तेलंगणामध्ये २०१६ पर्यंत त्या एका खासगी रूग्णालयात सेवा देत होत्या. त्यानंतर तेलंगणा महिला समिती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्री-पुरूष समानतेवर काम करत सुमारे १ लाख ४५ हजार महिला सभासद जोडल्या. पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये घेतलेल्या सभांमध्ये तेथील शक्ती या महिलांसाठी काम करणाऱ्या मोठ्या सामाजिक संस्थेने शेट्टी यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. आता देश पातळीवर महिलांसाठी काम करणाºया अनेक सामाजिक संस्थांना एकत्रित आणण्याचे काम त्या करत आहे.

टॅग्स :महिलासंसदराजकारण