Passport Service, India Post: तुम्ही जर परदेश दौऱ्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पासपोर्ट (Passport) असणं महत्वपूर्ण आणि अनिवार्य आहे. पासपोर्ट तयार करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं देशभरात विविध ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रांची स्थापना केलेली आहे. या केंद्रांना भेट देऊन तुम्ही पासपोर्ट मिळवू शकता. पण आता पासपोर्ट मिळविण्याच्या पद्धतीत आणखी सहजता येण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता पासपोर्ट मिळविण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्रांवर (Passport Seva Centre) वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही पासपोर्टसाठी अर्ज दाखल करू शकणार आहात. (now you can apply for passport at your nearest post office here are the details)
भारतीय डाक विभागानं (India Post) देशभरात आपल्या अनेक कार्यालयांमध्ये पासपोर्ट रजिस्ट्रेशन आणि पासपोर्ट अर्ज दाखल करण्यासाठीची सेवा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला फक्त पोस्ट ऑफिसच्या केंद्रावर जावं लागणार आहे. जिथं तुम्ही तुमच्या पासपोर्टसाठी अर्ज दाखल करू शकणार आहात.
भारतीय डाक विभागानं याची माहिती ट्विटर हँडलवरुन देखील दिली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आता पासपोर्ट रजिस्ट्रेशन आणि अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पासपोर्ट मिळविण्यासाठीच्या कामात आता अधिक सहजता आली आहे, असं ट्विट करण्यात आलं आहे.
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचीही सुविधापासपोर्टसाठी नागरिकांना आता ऑनलाइन रजिस्ट्रेशनची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. passportindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही पासपोर्टसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. यानंतर तुम्हाला पासपोर्टसाठीच्या अर्जाची पावती पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन घ्यावी लागेल. पासपोर्टसाठी अर्ज दाखल करताना तुम्ही स्वत: पोस्ट ऑफिस कार्यालयात उपस्थित असणं गरजेचं आहे. अर्जाच्या प्रिंटआऊटसह सर्व आवश्यत कागदपत्रांसह तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जावं लागेल.