आता मुंबईत ‘अंडर द स्काय’ मेजवानीचा आस्वाद घेता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 02:23 AM2017-11-05T02:23:48+5:302017-11-05T02:23:54+5:30
विस्तीर्ण समुद्रकिनारा, आपल्याच धुंदीत वाहणारा वारा, खळाळणा-या लाटा आणि सोबतीला आकाशातील चमचमत्या तारका... निसर्गाच्या या मनोहारी सानिध्यात जेवणाचा आस्वाद घेण्याचा आनंद काही औरच!
- चेतन ननावरे
विस्तीर्ण समुद्रकिनारा, आपल्याच धुंदीत वाहणारा वारा, खळाळणा-या लाटा आणि सोबतीला आकाशातील चमचमत्या तारका... निसर्गाच्या या मनोहारी सानिध्यात जेवणाचा आस्वाद घेण्याचा आनंद काही औरच! रूफटॉप रेस्टॉरंटला पालिकेची अधिकृत परवानगी मिळाल्याने, आता मुंबईत ‘अंडर द स्काय’ मेजवानीचा आस्वाद देशी-विदेशी पर्यटकांना निखळपणे घेता येणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणवणाºया मुंबईतील पर्यटन व्यवसाय आजही मागास असल्याची टीका होते, त्यात काही गैर नाही. सिंगापूर, हाँगकाँग अशा विविध देशांत अवलंबलेली रूफटॉप रेस्टॉरंट्स ही ‘अंडर द स्काय’ मेजवानीची पद्धत उशिरा का होईना, मात्र मुंबईत सुरू होणार आहेत. त्यामुळे मायानगरीत रोजगाराच्या दृष्टीने पोट भरण्यासाठी व मनोरंजनाच्या दृष्टीने जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आणखी एक पर्याय खुला झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे सुमारे ७ ते ८ लाख नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता हॉटेल उद्योगात व्यक्त केली जात आहे. सोबतच महापालिका आणि राज्य व केंद्र शासनाला या नव्या पर्यटनामुळे कर स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळेल, यात शंका नाही. मात्र, मुंबईकरांना या आगळ्यावेगळ्या अनुभवाची मेजवानी मिळणार हे विशेष आहे. नाइट लाइफची चर्चा असताना, रूफटॉप रेस्टॉरन्टला मंजुरी मिळाल्याचा आनंद हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत. समुद्रकिनारी बसून तासन्तास गप्पा मारणाºया पर्यटकांना, आता जेवणाची मजा लुटता-लुटता हा नजारा अनुभवता येणार आहे.
मुळात गेल्या ६ वर्षांहून अधिक काळापासून हा प्रस्ताव महापालिका दरबारी धूळ खात पडला होता. मकाऊ आणि दुबईसारख्या ठिकाणी जगातील सर्वाधिक नयनरम्य रूफटॉप रेस्टॉरंट पाहायला मिळतात. न्यूयॉर्क, लंडनसह बहुतेक देशांत रूफटॉपमधून हॉटेल जगतात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. अशा परिस्थितीत समुद्रकिनाºयासह स्कायलाइनची देणगी लाभलेली मुंबापुरी मात्र, पर्यायापासून वंचितच होती. राजकारण आणि लालफितीच्या कारभारात अडकलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली, तरी अद्यापही त्यात बºयाच सुधारणा होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या मंजुरीमध्ये घातलेल्या अटींमध्ये शेड बांधण्यास परवानगी नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रेस्टॉरंटचे भविष्य काय? हा प्रश्न निर्माण होतो. असे अनेक प्रश्न आहेत, ज्यावर पुढे हॉटेल व्यावसायिकांच्या संघटना चर्चा करून मार्ग काढतील. मात्र, सध्यातरी मुंबईत परदेशी पर्यटकांसह देशातील पर्यटकांना नव्या मेजवानीची दालने खुली झाली आहेत, यातच पर्यटक आनंदी आहेत.
पालिकेच्या या निर्णयामुळे केवळ हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंगच नव्हे, तर व्यावसायिक गाळे असलेल्या इमारतींनाही अच्छे दिन येणार आहेत. कारण जागेचे भाडे आणि वाढलेल्या कराच्या बोज्यातून सुटका होण्यासाठी रूफ टॉप हे आणखी एक कमाईचे साधन उपलब्ध होणार आहे. कारण मुंबईतील अनेक कॉर्पोरेट्स टॉवर हे सायंकाळी ६ वाजल्यानंतर ओस पडू लागतात. याउलट त्याच टॉवरच्या गच्चीवरून सायंकाळनंतर एका वेगळ्याच मुंबईचे दर्शन होते. मात्र, रूफटॉपच्या माध्यमातून याच सायंकाळी ओस पडणाºया टॉवरमधून आता नव्या मुंबईचे दर्शन घडू शकेल.
आकडेवारी काय सांगते?
1581
निवासगृहांची संख्या
12945
उपहारगृहांची संख्या
794
चित्रपट व नाट्यगृह
273755
व्यावसायिक आस्थापने