आता शाळा साेडल्याच्या दाखल्याशिवायही मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:05 AM2021-06-18T04:05:55+5:302021-06-18T04:05:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नववी, दहावीत एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तो ...

Now you can get admission in another school even without a school leaving certificate | आता शाळा साेडल्याच्या दाखल्याशिवायही मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

आता शाळा साेडल्याच्या दाखल्याशिवायही मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नववी, दहावीत एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय (टीसी) मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या आधीच्या संबंधित शैक्षणिक संस्थेने शाळा सोडल्याचा दाखला देण्यास अडवणूक केली किंवा दिला नाही तरी त्या विद्यार्थ्याला त्याच्या वयानुसार दुसऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेता येईल.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे खासगी संस्थांमधून अनुदानित किंवा शासकीय संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना मोठा दिलासा मिळेल. असे विद्यार्थी शाळाबाह्य झाल्यास किंवा शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित शाळा, मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश अडवणूक करणाऱ्या संस्थांनाही चाप बसेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.

एक शाळा साेडून दुसऱ्या शाळेत जाण्याचा निर्णय घेतल्यास आधीची शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करते. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश नाकारला जाताे, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशावेळी हे विद्यार्थी शाळाबाह्य होतात आणि शिक्षण प्रवाहापासून दूर फेकले जातात. केवळ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे हे अन्यायकारक तसेच शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारे आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र उशिरा दिले जात असेल व त्यामुळे प्रवेश नाकारला असेल, अशा विद्यार्थ्यांना नवीन शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरूप प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. यासाठी विद्यार्थ्याचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मानावे, असे शासन निर्णयात नमूद आहे.

* ...अन्यथा शाळा, मुख्याध्यापकांवर कारवाई

ज्या शैक्षणिक संस्था किंवा शाळा विद्यार्थ्यांना टीसीशिवाय प्रवेश नाकारेल किंवा प्रवेश नाकारल्याने एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तर अशा शाळेवर आणि तेथील मुख्याध्यापकांवर कडक कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

....................................................................

Web Title: Now you can get admission in another school even without a school leaving certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.