Join us

आता एका क्लिकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेशनकार्ड हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारतातील कित्येक नागरिक रास्त धान्य दुकानात मिळणाऱ्या धान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेशनकार्ड हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारतातील कित्येक नागरिक रास्त धान्य दुकानात मिळणाऱ्या धान्य सुविधेचा लाभ घेताता. परंतु, सरकार दरबारातून प्रतिमाणशी मंजूर झालेले धान्य आपल्याला मिळाले का, की पुरवठादाराने कमी धान्य दिले, याबाबत बऱ्याच जणांच्या मनात साशंकता असते. ‘मेरा रेशन’ अ‍ॅपमुळे ग्राहकांच्या मनातील या साऱ्या शंका दूर होणार आहेत.

‘मेरा रेशन’ अ‍ॅपद्वारे ग्राहकांना शासनाकडून मंजूर झालेले धान्य, रास्त धान्य दुकानातून त्यांनी उचललेले धान्य याची माहिती तर मिळणारच आहे, पण पुरवठादाराने धान्य देताना काही घोटाळा केल्यास त्याची तक्रारही नोंदवता येणार आहे. किंबहुना रेशनकार्डविषयी काही शंका असल्याचे त्याविषयी प्रश्न विचारण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे धान्य मिळण्यासाठी रेशनकार्ड पात्र आहे का नाही, याचे उत्तरही या अ‍ॅपवर मिळणार आहे. त्यासाठी रेशनकार्डचा क्रमांक अथवा आधार क्रमांक आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

.............................

जिल्ह्यातील लाभार्थी

एकूण – ३२,९७,६२१

बीपीएल – २३,७२९

अंत्योदय – २०,६१४

केशरी – ३२,५३,२१४

..............

तक्रार नोंदवा अ‍ॅपवर

- पुरवठादाराने धान्य देताना काही गडबड केल्यास त्याची तक्रार अ‍ॅपवर नोंदवता येणार आहे. शिवाय एखादा धान्यपुरवठादार धान्याचा साठा करून काळाबाजार करीत असल्यास त्याबाबतही येथे तक्रार दाखल करता येईल.

- त्यानंतर संबंधित कार्यालयाद्वारे तक्रारीची खातरजमा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. ग्राहकांना त्यांच्या तक्रारीची स्टेट्सही पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

...............

क्लिकवर मिळणार ही माहिती...

लाभार्थ्यांना मिळणारे धान्य, जवळपास असणारे रास्त धान्य दुकान, शिधापत्रिकेवर उचललेल्या धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र की अपात्र, याबाबतची माहिती ‘मेरा रेशन’ या अ‍ॅपमुळे एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या मनातील प्रत्येक शंका दूर होणास मदत होणार आहे.

.............

या नव्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना एका क्लिकवर सारी माहिती मिळणार आहे. शिवाय अ‍ॅपद्वारेच तक्रारही दाखल करता येणार असल्यामुळे त्यांना घरबसल्या आपल्या शंकेचे समाधान करून घेता येईल.

- प्रशांत काळे, उपनियंत्रक, पुरवठा विभाग