आता एका क्लिकवर कळणार बेस्टचे लोकेशन; 'चलो ॲप'चे आदित्य ठाकरेंकडून लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:39 PM2021-12-21T18:39:06+5:302021-12-21T18:46:19+5:30
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात बेस्ट ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबई - प्रवाशांना बेस्ट बसगाड्यांच्या वेळापत्रकासह कोणत्या थांब्यावर बस किती वाजता पोहचेल? याची माहिती मोबाईलमध्ये एका क्लिकवर मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या चलो ॲप आणि स्मार्ट कार्डचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. तसेच नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्डचा वापर करुन भविष्यात रेल्वेसह मेट्रोमधूनही मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात बेस्ट ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना कमी दरात तिकीट खरेदीही करता येणार आहे. गुगल प्ले स्टोरवर हे मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. या ॲपबरोबरच तिकीट आणि पाससाठी स्मार्ट मोबिलीटी कार्डही सुरू करण्यात आले आहे.
Immensely happy & proud to unveil the BEST ‘Chalo App’ & ‘Chalo Bus Card,’ ushering a new age of convenient & stress-free commute for Mumbaikars
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 21, 2021
Key features include:
•Mobile Tickets & Passes
•Live Bus Tracking
•Live Arrival Time
•Live Crowd Indicator
•Tap to Pay Smart Card pic.twitter.com/aYiYgkh4YZ
तर प्रवास होईल सुलभ....
या ॲपमुळे बसचे वेळापत्रक मोबाईलवर उपलब्ध होणार असल्याने बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे. प्रवासी असलेल्या थांब्यावर पुढची बस किती वेळात पोहचेल? त्या बसमध्ये गर्दी आहे का याची माहिती देखील आगाऊ मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.
कमी दरात तिकीट...
बेस्टने प्रवाशासाठी ७२ प्रकारची तिकीट योजना जाहीर केली आहे. यामुळे तिकिटांचा किमान दर पाच रुपये असला तरी सुपर सेव्हरमुळे प्रत्येक फेरीमागे एक रुपये ९९ पैशांची बचत होणार आहे. हे तिकीट या ॲप्लिकेशनवरुन काढता येणार आहे.
असे आहे मोबिलीटी कार्ड....
कॉमन मोबिलिटी कार्ड हे सर्व परिवहन सेवांसाठी वापरता येऊ शकते. हे तंत्रज्ञान स्विकारलेल्या परिवहन सेवेत प्रवाशाला या कार्डचा वापर करून प्रवास करता येईल. मेट्रोच्या स्मार्टकार्डप्रमाणे या कार्डमध्ये पैसे जमा असतील. प्रवास केल्यानंतर ते पैसे वजा केले जातील. त्यामुळे प्रवाशांना तिकीटाच्या रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
प्रवास योजना (प्रति फेरी पाच रुपये)
फेरी... ५०... १००... १५०
कालावधी... १४दिवस... २८दिवस... २८ दिवस
दर.. १९९...२४९.. २९९
प्रति फेरी सहा रुपये
कालावधी... १४दिवस... २८दिवस... २८ दिवस
दर.. २४९...२९९.. ३४९