आता मेट्रोचाही पास मिळणार; मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणारे विशेष सवलत
By सचिन लुंगसे | Published: March 23, 2023 04:59 PM2023-03-23T16:59:12+5:302023-03-23T16:59:24+5:30
मुंबईत विविध ठिकाणी भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी अमर्याद ट्रीप पास ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
मुंबई : मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या प्रवाशांसाठी महा मुंबईमेट्रो आता विशेष मासिक आणि दैनिक पास सुरु करणार आहे. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळांचे अध्यक्ष एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी याची घोषणा केली असून, त्या नुसार या सेवा दिल्या जाणार आहेत. जे प्रवासी मुंबई १ हे कार्ड वापरत आहेत त्यांना त्यांना विशेष सवलत दिली जाईल. त्या नुसार ३० दिवसांच्या कालावधीत ४५ वेळा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १५ टक्के सूट तर ६० वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी २० टक्के सूट दिली जाईल. याचे शुल्क मुंबई १ कार्ड माध्यमातून आकारले जाईल.
मुंबईत विविध ठिकाणी भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी अमर्याद ट्रीप पास ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्या नुसार १ दिवसीय पासचे शुल्क ८० रुपये असेल तर ३ दिवसांकरिता २०० रुपये आकारले जातील. मुंबई १ कार्ड द्वारे सोमवार ते शनिवार ५ टक्के, रविवारी आणि राष्ट्रीय सुट्टी दिवशी १० टक्के सवलत आहे. मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ पैकी दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका २ अ ही सुमारे १८.६. किमी लांबीची आहे. तर अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका ७ सुमारे १६.५ किमी लांबीची आहे. २०१५ मध्ये या मार्गिकांची पायाभरणी करण्यात आली होती.
- मुंबई वन हे कार्ड हरवले तर कार्ड मधील शिल्लक रक्कम परत मिळणार नाही.
- कार्ड खराब झाले तर नवीन कार्ड साठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल.