मुंबई : मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या प्रवाशांसाठी महामुंबईमेट्रो आता विशेष मासिक आणि दैनिक पास सुरू करणार आहे. महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी याची घोषणा केली असून, त्यानुसार या सेवा दिल्या जाणार आहेत.
जे प्रवासी मुंबई १ हे कार्ड वापरत आहेत, त्यांनाही ही विशेष सवलत दिली जाईल. त्यानुसार ३० दिवसांच्या कालावधीत ४५ वेळा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १५ टक्के सूट, तर ६० वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी २० टक्के सूट दिली जाईल. याचे शुल्क मुंबई १ कार्ड माध्यमातून आकारले जाईल.
मुंबईत भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी अमर्याद ट्रीप पास ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्या नुसार १ दिवसीय पासचे शुल्क ८० रुपये असेल, तर ३ दिवसांकरिता २०० रुपये आकारले जातील. मुंबई १ कार्ड द्वारे सोमवार ते शनिवार ५ टक्के, रविवारी आणि राष्ट्रीय सुटी दिवशी १० टक्के सवलत आहे.
आम्ही मुंबई मेट्रो या पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. मुंबईकरांचा दैनंदिन मेट्रो प्रवास हा अधिकाधिक सुखकर व्हावा या हेतूने आम्ही सातत्याने नवनवीन पर्यायांचा विचार करत आहोत. नवीन ट्रिप पास योजनेमुळे तिकीट प्रक्रिया सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल.- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए