BKCत उभे राहणार NPCIचे जागतिक मुख्यालय; CM फडणवीस यांच्या उपस्थितीत भूखंड हस्तांतरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 05:35 IST2025-03-02T05:34:14+5:302025-03-02T05:35:16+5:30
देशातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट प्रणालीचे नियमन करणाऱ्या एनपीसीआयने भूखंड देण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती.

BKCत उभे राहणार NPCIचे जागतिक मुख्यालय; CM फडणवीस यांच्या उपस्थितीत भूखंड हस्तांतरण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एमएमआरडीएने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) बीकेसीमध्ये जागतिक मुख्यालय उभारण्यासाठी वाणिज्यिक भूखंड दिला आहे. कृत्रिम प्रज्ञेला (एआय) केंद्रस्थानी ठेवून आयोजित केलेल्या ‘मुंबई टेक वीक २०२५’ कार्यक्रमात जी-ब्लॉकमधील सी-४४ आणि सी-४८ या भूखंडांचे ताबा पत्र देण्यात आले. ६,०१९.१० चौ. मीटर क्षेत्रफळाचा वाणिज्यिक भूखंड ८० वर्षांच्या लीजवर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भूखंडाचे हस्तांतरण करण्यात आले.
यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हेही उपस्थित होते. देशातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट प्रणालीचे नियमन करणाऱ्या एनपीसीआयने भूखंड देण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत एमएमआरडीएच्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भूखंड मंजूर करण्यात आला.
वांद्रे-कुर्ला संकुलात एनपीसीआयच्या मुख्यालयाच्या स्थापनेमुळे मुंबईच्या फिनटेक इकोसीस्टमला चालना मिळणार आहे. या क्षेत्रात नावीन्य आणि रोजगार निर्मितीसाठी नव्या संधीही निर्माण होतील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
मुंबईत एनपीसीआयने मुख्यालय उभारल्यामुळे फिनटेक क्षेत्रातील नवकल्पनांना चालना मिळत राहील आणि डिजिटल व्यवहारांमध्ये भारताची आघाडी अधिक भक्कम होईल. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री.
वांद्रे-कुर्ला संकुल हे भारतातील अग्रगण्य आर्थिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. नावीन्यपूर्ण संस्थांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची हमी देण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए