Join us

एनपीआर, एनआरसी एकच, भूलथापांना बळी पडू नका - उमर खालिद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 7:14 AM

उमर खालिदचे आवाहन; आझाद मैदानात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन

मुंबई : देशात केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनआरसी) मंजुरी मिळाली. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु दोन्ही गोष्टी एकच असून भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन विद्यार्थी नेता उमर खालिद याने केले.

सीएए, एनआरसी, एनपीआरला विरोध दर्शविण्यासाठी आझाद मैदान येथे शुक्रवारी जॉर्इंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिस यांच्या नेतृत्वाखाली विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते. माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, अभिनेत्री स्वरा भास्कर, जामिया, जेएनयू, एएमयू, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स आदी विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनादरम्यान भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत मोर्चाही काढण्यात येणार होता, परंतु मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना खालिद म्हणाला की, संसदेत भाजपचे ३०३ सदस्य आहेत, पण त्याचा त्यांना गर्व आहे. त्यामुळेच हे विधेयक त्यांनी आणले. परंतु त्यांचे ५४४ खासदार असते तरी त्यांच्याही वरती देशाचे संविधान आहे. भारतीय जनतेने दाखविलेल्या एकतेमुळे भाजपचे गर्वहरण झाले आहे, असेही त्याने सांगितले.आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचे त्याने या वेळी कौतुक केले. तो म्हणाला की, मुंबईकर केवळ कामात व्यस्त असतात. मोर्चे, आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात. पण आज मुंबईने दाखवून दिले की कामही करू आणि संविधानाचे संरक्षणही करू.तो पुढे म्हणाला की, केंद्र सरकार आंदोलकांना अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा आवाज आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरसी नाही असे सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बोलतात आणि गृहमंत्री अमित शहा याचसंदर्भात दुसरेच काहीतरी सांगतात. नागरिकांची एकता, आक्रोश पाहून आता एनपीआर आणल्याचे सांगितले जात आहे. परंतु या दोन्ही बाबी एकच असून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्याने केले.आंदोलकांचा आवाज दाबू नये - कोळसे पाटीलनिवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले की, एनआरसी, एनपीआर, सीएएचे समर्थन न करता नागरिकांनी याविरोधात आवाज उठविला पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे, परंतु आंदोलन करताना कायद्याचे उल्लंघन करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्राने आंदोलकांचा आवाज दाबू नये. देशातील कोणत्याही शक्तीपेक्षा जनशक्ती मोठी असते याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही ते म्हणाले.प्रत्येक भारतीयासाठी त्रासदायक - स्वरा भास्करअभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली की, एनआरसी, एनपीआर, सीएए हे केवळ मुस्लिमांना त्रासदायक नाही तर प्रत्येक भारतीयाला त्याचा त्रास होणार आहे. हे संविधानाच्या विरोधात असून प्रत्येक भारतीय संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आहे. या वेळी तिने उत्तर प्रदेश, दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा, हिंसाचाराचा निषेध केला.

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयकमुंबई