'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 07:38 PM2018-08-01T19:38:34+5:302018-08-01T19:41:16+5:30
आसामप्रमाणेच मुंबईतही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे.
मुंबई:आसामप्रमाणेचमुंबईतही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) लागू करण्यात आलं आहे. आसामप्रमाणेच मुंबईसह संपूर्ण देशभरातदेखील याची अंमलबजावणी करा. यामुळे अवैध बांगलादेशींची ओळख पटेल, असं ते म्हणाले.
आसाममध्ये लागू करण्यात आलेलं एनआरसी मुंबईसह देशभरात लागू करा, अशी मागणी पुरोहित यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. नागरिकांची पडताळणी करुन अवैधपणे वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशींना शोधून काढण्यात यावं, असं पुरोहित यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजपा सरकार याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आसाममध्ये एनआरसी लागू करण्यात आलं आहे. या रजिस्टरमध्ये 40 लाख लोकांची नावं नाहीत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आसाममधील या घटनेचे पडसाद संसदेतदेखील उमटले आहेत.
Maharashtra: If NRC can be implemented in Assam than NRC should be implemented in Mumbai&across the https://t.co/qfc1lWqiEB I have written to District collector Mumbai, ACS Home, CP Mumbai, State EC to implement NRC&identify the Bangladeshis in Colaba&Mumbai: Raj Purohit, BJP MLA pic.twitter.com/gXtO3d5o8K
— ANI (@ANI) August 1, 2018
आसाममध्ये एनआरसी लागू करण्यात आल्यानंतर आता देशभरातील भाजपा नेते त्यांच्या राज्यातही एनआरसी लागू करण्याची मागणी करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत आल्यास एनआरसी लागू करुन अवैध बांगलादेशींना हाकलून लावू, असं पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलं होतं. याशिवाय भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आसामप्रमाणेच दिल्लीतील नागरिकांचीही पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. दिल्लीत रोहिग्यांचं प्रमाण मोठं आहे. याशिवाय इतर देशांमधून आलेले असंख्य लोक दिल्लीत अवैधपणे राहतात. त्यांच्याकडे शिधापत्रिका आणि आधार कार्डदेखील आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.