मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या नव्या कायद्यामुळे मुस्लीम समाजासोबतच हिंदूंनाही फटका बसणार असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार कपिल पाटील, धनराज वंजारी, अरुण सावंत आदी नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. एनआरसी आणि सीएएविरोधात वंचित आघाडी, समविचारी संघटनांकडून २६ डिसेंबरला दादर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे ४० टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, हे स्पष्ट केले. राज्यात १६ टक्के समाज असा आहे ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या नोंदी नाहीत. राज्यात डिटेन्शन कॅम्प उभारले जाताहेत हे मी तीन महिन्यांपूर्वी जनतेला, माध्यमांना सांगितले होते, त्याचीही माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली.
या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून २६ तारखेचे धरणे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. एनआरसी आणि सीएएसोबतच कोरेगाव भीमाबाबत माझ्याकडील माहितीही मुख्यमंत्र्यांनी मागितली असून पुढील बैठकीत ती मी त्यांच्याकडे सुपुर्द करणार असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.